
लग्नाचे आमिष दाखवून पोलिस उपनिरीक्षकाकडून महिलेवर बलात्कार
तुला काय करायच ते कर मला कोणी काही करु शकत नाही म्हणत धमकी, दोन वर्षांपासून विवाहित महिलेचे शोषण, पोलीस दलात खळबळ
पुणे – पिंपरी चिंचवडच्या पोलिस उपनिरीक्षकावर पुण्यातील फुरसुंगी पोलिस ठाण्यात विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजिंक्य रायसिंग जाधव असे त्याचे नाव आहे. याबाबत ३४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएसआय जाधव आणि पीडित तरुणी यांची ओळख २०२३ मध्ये सोशल मीडियावर झाली होती. या ओळखीचे रूपांतर लवकरच मैत्रीत आणि नंतर प्रेमसंबंधात झाले. जाधव यांनी महिलेला लग्नाचे आमिष दाखवत वारंवार बलात्कार केला. विशेष म्हणजे महिलेचे लग्न झाल्याची जाधव यांना माहिती होती. तसेच महिलेने पतीपासून घटस्फोट घेण्याची देखील तयारी केल्याची माहिती आहे. याच कारणामुळे महिला जाधव यांच्याकडे लग्नासाठी तगादा लावत होती. त्यामुळे जाधव यांनी तिला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच तुला काय करायच ते कर मला कोणी काही करु शकत नाही अशी धमकी दिली. अलीकडे महाराष्ट्रात पोलीस अधिकाऱ्यांकडून महिलांचे शोषण होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. जळगाव, अहिल्यानगर आणि आता पुण्यात अशी घटना समोर आल्यानंतर पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
त्रासाला कंटाळून तरुणीने फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य जाधव याच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश खांडे पुढील तपास करत आहेत.