
‘तु भिकारी आहेस, समोर आला तर थप्पड मारीन’
पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, ५४ मिनिटाचा व्हिडिओ बनवत घेतला गळफास
दिल्ली – अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. महिला अत्याचाराप्रमाणेच पुरुषांनाही मानसिक अत्याचार सहन करावे लागतात. याची चर्चा होऊ लागली होती. पण अतुल सुभाष प्रकरण चालू असताना पत्नीच्या त्रासाला कंटाळून दिल्लीतील एका तरूणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे.
पुनीत खुराना असं आत्मतहत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. त्यांची पत्नी मनिका पाहवा ही त्याला त्रास देत असल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचललं आहे. राजधानी दिल्लीतील मॉडेल टाऊनमधील कल्याण विहारमध्ये खुराणा यांनी आपल्या राहत्या घरी ५४ मिनिटांचा व्हिडिओ बनवून गळफास घेत जीवन संपवलं आहे. पुनीत हा दिल्लीतील प्रसिद्ध बेकरी व रेस्टॉरंट व्यावसायिक होता. त्याचे त्याच्या पत्नीशी वाद सुरू होते. दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. आठ वर्षांपूर्वी दोघांचे लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांत त्यांच्यात वाद होऊ लागले होते. दोन वर्षांपूर्वी पुनीतची पत्नी ही त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. यानंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटाचा खटला दाखल केला. या दोघांमधील संभाषणाचा एक ऑडिओही व्हायरल होत आहे.
यामध्ये आपला घटस्फोट झाला असला तरी मी अजूनही बिझनेस पार्टनर आहे. माझी इतर थकबाकी क्लिअर करावी लागेल. तर ती पतीला भिकारी म्हणाली आणि समोर आल्यास तुला थप्पड मारेन असेही पत्नी पुनीतला म्हणाली होती. पत्नीसोबत सुरू असलेल्या याच वादामुळे पुनीत हा तणावाखाली होता, असे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी पुनीत खुराना प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, पुनीत कौटुंबिक समस्यांमुळे मानसिक तणावातून जात होता. या घटनेने पुन्हा एकदा पती-पत्नी आणि कौटुंबिक वादाचा मुद्दा समोर आला आहे.