
‘तू बारीक आणि खूप गोरी आहेस. मला तू आवडतेस, उद्या भेटू’
रात्री अश्लील मेसेज पाठवणाऱ्या इंजिनियरला नगरसेविकेने शिकवला धडा, अशी घडवली अद्दल
मुंबई – माजी नगरसेविकेला रात्री उशीरा व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज पाठवणाऱ्याला कनिष्ठ न्यायालयाने दिलेली शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. जानेवारी २०१६ मधील ही घटना आहे. कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाला आरोपीने सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. पण त्याला झटका बसला आहे.
बोरिवली परिसरातील तत्कालीन नगरसेविकेला आरोपी नरसिंह गुडेने २६ जानेवारी २०१६ रोजी व्हॉट्सॲपवरून संदेश पाठवले. त्यात, तू झोपलीस का? तुझे लग्न झाले आहे का? तू छान दिसतेस. तू खूप गोरी आहेस. मला तू आवडतेस. माझे वय ४० वर्षे आहे. मी तुला उद्या भेटतो, असे लिहिले होते. तक्रारदार महिलेने पतीला याबाबत सांगितल्यानंतर त्याने लागलीच संबंधित क्रमांकावर फोन केला. त्यावेळी आरोपी नरसिंह गुडेने फोन उचलला नाही. मात्र, माफ करा, रात्रीच्या वेळी फोन घेत नाही. मला व्हॉट्सॲप चॅटिंग करायला आवडते, आपण ऑनलाईन बोलू शकतो, असा तक्रारदार महिलेला पुन्हा संदेश पाठवला आणि त्यासह काही अश्लील छायाचित्रे पाठवली होती. आरोपीने तक्रारदार महिलेला पाठवलेले संदेश आणि छायाचित्रे खरेच अश्लील आहेत. तसेच आरोपीचे तक्रारदार माजी नगरसेविकेसह तिच्या पतीशी काहीही संबंध नसल्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले होते. पण आरोपीने तक्रारदार महिलेने राजकीय सूडबुद्धीने आपल्याविरोधात खोटी तक्रार दाखल केल्याचा दावा केला होता. पण न्यायालयाने तो दावा फेटाळून लावला आहे. तसेच आरोपीने मेसेज आणि फोटो पाठवले नाही हे सिद्ध करण्यासाठीही न्यायलयाने संधी दिली होती. मात्र आरोपीला स्वत:ला सिद्ध करता आले नाही. त्यामुळे न्यायालयाने आपली शिक्षा कायम ठेवली आहे.
याप्रकरणात न्यायालयाने गुडे यांना ठोठावण्यात आलेला तीन महिन्यांचा साधा कारावास आणि दंडाची शिक्षा कायम ठेवली. यासह न्यायालयाने बोरिवली येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने दिलेल्या शिक्षेविरुद्ध गुडे यांनी दाखल केलेले याचिका फेटाळून लावली आहे.