
आईने नशा करण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाचे भयंकर कृत्य
तरूणाने केलेल्या भयंकर प्रकार सीसीटीव्हीत कैद, तरूणाच्या रागाचा सोसायटीला फटका, पुण्यात गुंडाराज?
पुणे – शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण फार वाढले आहे. आजकाल इथले हिंसक प्रकार फार वाढले आहेत. त्यातच गाड्यांची तोडफोड आणि आग लावणे अशा घटना नित्याच्या बनल्या आहेत. त्यातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
आईने नशा करण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणातून एका तरूणाने तब्बल १३ दुचाकी गाड्या जाळल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना घडली आहे. स्वप्निल शिवशरण पवार असे त्या तरुणाचे नाव असून तो २७ वर्षांचा आहे. आईने ड्रग्जसाठी पैसे देण्यास नकार दिला म्हणून त्याने तो राहत असलेल्या सोसायटीतील रहिवाशांच्या दुचाकी जाळून टाकल्या. दरम्यान ही घटना बुधवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. स्वप्निलच्या आईने सांगितल्याप्रमाणे, तो पहाटे 2-3 च्या सुमारास घरी पोहचला आणि त्याने आईकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. जेव्हा आईने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्याने संपूर्ण इमारतीला आग लावण्याची धमकी दिली. सध्या स्वप्नीलला पोलिसांच्या हवाली केले असून त्याच्या आईने आणि भावाने त्याला जामिनावर न सोडण्याची विनंती केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून तो कुटुंबाला त्रास देत असल्याचे त्याने सांगितले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुण मध्यरात्री पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकीला आग लावत आहे. आग लावताक्षणीच दुचाकी पेट घेते आणि सर्वत्र आगीचा भडका उडतो. आपले काम पूर्ण केल्यांनतर तो तेथून पळून जातो.
या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @punepulse नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, किमान १३ वाहने जळून खाक झाली. रहिवाशांनी तक्रार दाखल केल्यानंतर लगेचच त्याला अटक करण्यात आली आहे.