
लोकलमध्ये थ्री इडियट स्टाईलने तरुणाने केली महिलेची डिलिव्हरी
अचानक गर्भवती महिलेचे अर्धे बाळ बाहेर आले आणि तरूणाने घेतला धाडसी निर्णय, तरुणावर कौतुकाचा वर्षाव, व्हिडिओ जोरदार व्हायरल
मुंबई – मुंबईकरांची लाईफ असलेली मुंबई लोकल सतत धावत असते. याच लोकलमध्ये एक अभूतपूर्व घटना घडली आहे. एका तरुणाने प्रसव पीडा सुरू झालेल्या महिलेची थ्री इडियट चित्रपटाप्रमाणे प्रसूती केली आहे. त्यामुळे त्याचे जोरदार कौतुक होत आहे.
मुंबईच्या राम मंदिर स्थानकावर गर्भवतीच्या प्रसुतीसाठी विकास बेंद्रे हा चक्क डॉक्टर बनल्याचे समोर आले आहे. एक गर्भवती गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकल ट्रेनने प्रवास करत होती. प्रवास करत असताना अचानक तिला तीव्र प्रसुती वेदना सुरू झाल्या. ती मदतीसाठी ओरडू लागली. परंतु तिच्या मदतीसाठी कोणीही धावून आले नाही. याचवेळी तिच्याच डब्ब्यातून प्रवास करणारा विकास बेद्रे या तरुणाने तत्काळ ट्रेनची इम्रर्जन्सी चैन ओढत राम मंदिर रेल्वे स्थानकावर लोकल थांबवली. परंतु राम मंदिर स्थानकावर तातडीने कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हती. तसेच रुग्णवाहिका पोहोचायलाही वेळ लागणार होता. तिचे बाळ अर्धे बाहेर आणि अर्धे आत अशा नाजूक स्थितीत अडकले होते. त्यामुळे हा प्रसंग पाहून विकास बेद्रे याने जराही वेळ न घालवता तत्काळ त्याची मैत्रिण असलेल्या डॉ. देविका देशमुख हिला व्हिडीओ कॉल केला आणि परिस्थितीची माहिती दिली. परिस्थितीची जाणीव होताच डॉ. देविका देशमुख हिने विकासला शांतपणे प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजावून सांगितली. वैद्यकीय शिक्षणाचा कोणताही अनुभव नसतानाही विकासने धैर्य आणि संयम दाखवला. त्याने डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक सूचना काळजीपूर्वक पाळली. अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि राम मंदिर रेल्वे स्थानकावर रात्री 1.30 ते 2 वाजण्याच्या सुमारास यशस्वीपणे ती महिला बाळंत झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी आणि प्रवाशांनी विकासला टाळ्यांचा कडकडाट करून सलाम केला. यानंतर त्या महिलेची व तिच्या नवजात मुलीची सुरक्षितरीत्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था करण्यात आली. डॉक्टरांनी दोघांची प्रकृती ठणठणीत असल्याचं सांगितले आहे. वैद्यकीय अनुभव नसतानाही दाखवलेल्या त्याच्या तत्परतेने व शांतचित्त निर्णयाने एका नवजीवाचा सुरक्षित जन्म झाला.
या घटनेनंतर, विकास बेद्रे आणि डॉ. देविका देशमुख यांच्या धाडसी प्रयत्नांना सर्वत्र प्रचंड कौतुक मिळालं आहे. त्यांची माणुसकी आणि धैर्याची भावना सामाजिक मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक लोक विकास बेद्रे यांना “देव माणूस” असे संबोधत आहेत.