
गाडीला कट मारल्याच्या रागातून तरुणाचा भररस्त्यात खून
तरुणीवरही हल्ला, हायवेवर खुनाचा थरार, सोनाली आणि अनमोल सोबत नेमकं काय घडले?
लातूर – कारला कट मारण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात सोलापूरच्या तरुणाचा खून करण्यात आला. यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. शहरातील रिंग रोड भागात बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
या घटनेत अनमोल केवटे याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेली सोनाली सुखदेव भोसले ही गंभीर जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लातूर शहरात भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या मेळाव्यासाठी सोलापूरहून लातूरला आले होते. सोनाली भोसले यांना संघटनेचे पद देण्याबाबत त्यांची पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. पद देण्यासाठी त्यांनी नकार दिल्यानंतर जेवण करून ते रात्री सोलापूरच्या दिशेने निघाले. पाच नंबर चौक, खाडगाव रोडने औसाकडे येताना जीप ओव्हरटेक करत असताना कट लागला. यावेळी चालकाने शिवी दिली. त्याला अनमोल केवटे यानेही दमबाजी केली. पुढे काही अंतरावर जाऊन जीप रस्त्याच्या आडवी केली. केवटे व सोनाली भोसले गाडीतून खाली उतरले. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची, शिवीगाळी झाली. दोघांत झटापट झाली. याच क्षणी हल्लेखोरांनी जवळील धारदार चाकूने अनमोलच्या गळ्यावर आणि मानेवर वार केला. गंभीर जखमी झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यानंतर सोनालीवर हल्ला करत तिच्या छातीत तीन वेळा आणि पाठीवर दोन वेळा चाकू भोसकण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत तीही जमिनीवर पडली. हल्ला करून आरोपी तात्काळ पसार झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून गुन्ह्यातील संशयित आरोपी शुभम जयपाल पतंगे याला अटक करण्यात आली आहे. उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे.
कारचालक नवनाथ लक्ष्मण धाकपाडे याने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार खुनाचा गुन्हा नोंद झाला. सोनाली यांच्यावर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास सुरू आहे.