
आईशी अनैतिक संबधाच्या संशयातून तरुणाचा खून
अल्पवयीन मुलाकडून कोयत्याने वार करत तरूणाला संपवले, परिसरात भीतीच वातावरण
दाैंड – दौंड शहरात एका अल्पवयीन मुलाने आईच्या प्रियकराचा निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. खून केल्यानंतर तो स्वतः पोलिस ठाण्याकडे पायी निघाला होता. पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातील बाजार तळाजवळील इंदिरानगर येथे हा खून करण्यात आला.
प्रविण दत्तात्रेय पवार असे हत्या करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल १४ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा-बाराच्या सुमारास ही घटना घडली. विशाल उर्फ नान्या थोरात या तरुणाने प्रवीण पवार यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पवार यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपीला त्याच्या आईचे आणि प्रवीण पवार यांचे अनैतिक संबंध सुरु असल्याचा संशय होता. संशय वाढत गेल्याने त्याने पवार यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. प्रवीण थोरात यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि हातावर वार करण्यात आले. प्रवीण पवार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर भाजी विक्रेता नितीन गुप्ते यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. हत्या झालेल्या तरुणावर देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
दौंड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. रात्रीच्या वेळी ही घटना घडली असून आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.