
जुन्या वादातून भरचाैकात तरुणाला टोळक्याची बेदम मारहाण
मारहाणीचा थरार सीसीटीव्हीत कैद, लाथा बुक्क्या आणि काठीने मारहाण, परिसरात भीतीचे वातावरण
जळगाव- जळगाव शहरातील कांचनगर भागात एका तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. सहा ते सात जणांच्या टोळीने तरुणाला लाथा-बुक्क्या आणि काठीने मारहाण केली आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
दुर्गेश चंद्रकांत सपकाळे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. दुर्गेश चंद्रकांत सपकाळे हा तरुण आपल्या कुटुंबासह राहतो. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी तो कांचन नगर परिसरातील उज्ज्वल चौकात उभा असताना त्याला जुन्या वादातून धनंजय उर्फ आकाश बाविस्कर, सागर बाविस्कर, प्रतिक उर्फ प्रेम बाविस्कर, गायकवाड (पूर्ण नाव माहिती नाही) आणि त्यांच्या सोबत असलेले अनोळखी दोन जणांनी बेदम मारहाण केली. ज्यामुळे दुर्गेश जखमी झाला. तसेच, आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकी देत दमदाटी केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. जखमी दुर्गेश सपकाळे याने शनीपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्याच्या तक्रारीवरून धनंजय उर्फ आकाश बाविस्कर, सागर बाविस्कर, प्रतिक उर्फ प्रेम बाविस्कर, गायकवाड आणि दोन अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबतचा व्हिडीओ समोर आल्यानंतर शनीपेठ पोलिसांनी दखल घेतली आहे.
पोलिसांनी सहा जणांविरोधात मारहाणीसह जीवे मारण्याच्या प्रयत्न अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. शहरात दिवसाढवळ्या घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.