
पेट्रोलपंपावर पेट्रोल भरत असताना तरुणावर चाकूहल्ला
हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद, हल्ल्यात तरुण गंभीर जखमी, या किरकोळ कारणातून हल्ला, काय घडले?
कामठी – नागपूर जिल्ह्यातील कामठी हद्दीतल्या एका पेट्रोलपंपावर सायंकाळी पाचच्या सुमारास दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी उभ्या असलेल्या तरुणावर एकाने अचानक चाकूचा हल्ला चढवल्याने परिसरात एकच घबराट निर्माण झाली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नितेश श्यामलाल सिरसाम असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. कामठीतल्या गवळीपूरा येथील रहिवासी नितेश हा मित्रासोबत बाहेर जात होता. गाडीतले इंधन संपल्याने तो बसस्थानकावजवळील ए. पी.च्या पेट्रोलपंपावर पेट्रोल भरत होता. त्यावेळी आशीष हुसैन मेंढे तेथे आला त्याने नितेशवर चाकूने हल्ला चढविला. नितेशनेही यावेळी जोरदार प्रतिकार करत आशीषला चांगलाच चोप दिला.या हल्ल्यात नितेश सिरसाम याच्या मानेवर आणि पाठीवर चाकूचे वार बसल्याने तो जखमी झाला आहे. त्याच्यावर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नितेशने आशीषकडून फेब्रुवारीमध्ये १० हजार रुपये उसने घेतले होते. त्यातूनच आशीषने हा खूनी हल्ला केल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्यातून येतात ते राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत तरीही नागपूरात ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही घटना घडली त्यावेळी फडणवीस नागपूर दौऱ्यावर होते, त्यामुळे नागपूरमधील कायदा सुव्यवस्था चर्चेत आली आहे.
नितेशची पत्नी अंजली यांनी दिलेल्या तक्रारीवरून कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल करत हल्लेखोर आशिषला अटक केली आहे. गुन्हेगारांवर अंकूश ठेवण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून संताप व्यक्त होत आहे.