
गावाहून आलेल्या तरुणीची वस्तीगृहात आत्महत्या
त्या काॅलमुळे तरुणीच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, गायत्रीने टोकाचा निर्णय का घेतला?
कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागातील एम. ए., एम. एस्सी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या गायत्री पंढरीनाथ रेळेकर या विद्यार्थिनीने नैराश्येतून विद्यापीठातीलच सावित्रीबाई फुले वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
गायत्री राखीपोर्णीमेसाठी गावी गेली होती. ती ११ तारखेला गावावरुन परतल्यानंतर दुपारच्या वेळी तिच्या मैत्रिणींनी तिचा खोलीचा दरवाजा ठोठावला. फोन केले. पण त्यांना आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी खिडकीतून पाहिले असता, ओढणीच्या साहाय्याने गायत्रीने पंख्याला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. गायत्री रेळेकर ही सोमवारी सकाळी सांगलीवरून कोल्हापूरला आली. सकाळी साडेअकराच्या सुमारास तिने वडिलांना फोन करून, “मी सुखरूप पोहोचले…” अशी माहिती दिली होती. पण नंतर तिने आत्महत्या केल्याचे दिसून आले. गायत्रीने मृत्यूपूर्वी एका तरुणाशी देखील फोनवरुन संभाषण केल्याची माहिती समजते. वसतिगृहातीलच मुलीने गायत्री फोनवर बोलताना रडत असल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे याचे गुढ वाढले आहे. मुलींनी तत्काळ ही बाब वसतिगृह अधीक्षकांना कळवण्यात आली, तसेच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. गायत्रीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवतानाही नातेवाईकांनी काही काळ शवविच्छेदनाला विरोध दर्शवला होता. त्यामुळे रुग्णालय परिसर तणावपूर्ण बनला होता. विद्यापीठाच्या वस्तीगृहातील ही दुसरी आत्महत्येची घटना आहे. याआधी २०१४ मध्ये सांगली जिल्ह्यातीलच एका विद्यार्थिनीने तीन नंबर वस्तीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर आताही पुन्हा आत्महत्येची घटना घडली आहे.
गायत्रीच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गायत्री सामान्य अवस्थेत गावावरून परतली होती, असे तिच्या मैत्रिणींचे म्हणणे आहे. तरीही तिने आत्महत्येचा निर्णय का घेतला, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. त्यामुळे पोलिसांनी तिच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड्सच्या आधारे तपास सुरू केला आहे.