‘तुमचाही संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल’
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आमदाराच्या पुतण्यास धमकी, काही दिवसापूर्वी झाला होता गोळीबार
धाराशिव – राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण गाजत आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने या मुद्यावरुन राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचे जोरदार प्रयत्न केले. पण आता आणखी एक बातमी समोर आली आहे. माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आली आहे.
धाराशिवचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत व केशव सावंत यांना अशाच प्रकराची जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. तेरणा साखर कारखान्यासाठी ऊस वाहतुक करणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकाकडे बंद पाकीटामध्ये १०० रुपयांच्या नोटेसोबत धमकीची चिठ्ठी देण्यात आली आहे. या धमकीच्या चिठ्ठीमध्ये तुमचाही संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल, असे लिहिण्यात आले आहे. या पत्रानंतर प्रकरणानंतर तेरणा कारखान्याचे शेतकी अधिकारी मच्छिंद्र पुंड व सुनिल लगडे,संजय निपाणीकर यांनी ढोकी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. आता ढोकी पोलीसांकडुंन घटनेचा पुढील तपास करत आहेत. धनंजय सावंत व केशव सावंत सोनारी, वाशी, ढोकरी येथील साखर कारखान्याचा कारभार सांभाळत असतात. दरम्यान परंडा तालुक्यातील सोनारी येथील धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबाराची घटना घडली होती. त्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेमागील सुत्रधाराचा अद्याप शोध लागलेला नाही. आता ह्या धमकीच्या पत्राने खळबळ उडाली आहे. सावंत बंधू कोणाच्या रडारावर आहेत, हा प्रश्न उपस्थितीत झाला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील माजी मंत्री व आमदार तानाजी सावंत यांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज आहे. त्यांनी नागपूर अधिवेशनात सहभाग न घेताच माघारी परतले होते. एवढेच नाही तर त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील डीपी आणि पक्षाचा फोटो देखील काढून टाकला होता.