
पुण्यात आयटी पार्कसमोर तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला
हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल, दोघेजण आले आणि तलवारीने वार केले, नागरिक भीतीच्या सावटात
पुणे – पुण्यातील रामवाडी परिसरातील आयटी पार्कसमोर पहाटे तीन वाजता दुचाकीवर बसलेल्या एका तरुणावर दोन अज्ञात व्यक्तींनी कोयता आणि तलवारीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे तीन वाजता घडली. एक तरुण आयटी पार्कच्या गेटसमोर दुचाकीवर उभा होता. अचानक तिथे दोन तरुण आले, त्यांच्या हातात शस्त्र होती. त्यांनी सुरुवातीला त्या तरुणाला काही प्रश्न विचारले, पण अचानक त्यांनी त्या तरुणाशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी एका तरुणाने अचानक त्या तरुणावर तलवारीने हल्ला केला. ही संपूर्ण घटना कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे की, दुचाकीवरील तरुणाच्या हातावर आणि डोक्यात तलवारीचे वार करण्यात आले. शेवटी तो तरुण आपली दुचाकी सोडून पळून गेला, त्यामुळे तो बचावला. शेवटी एक तरुण त्याठिकाणी आला आणि त्याने त्या धुडगूस घालणाऱ्या तरुणांना शांत केले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण याचा व्हिडिओ समोर आल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
आयटी पार्क परिसरात पहाटेच्या वेळेस असा धाडसी हल्ला झाल्याने पोलिसांच्या गस्त आणि नियंत्रण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी केली जात आहे.