
कॉलेजमध्ये झालेल्या जुन्या भांडणाच्या रागातून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने तरुणाच्या घरात घुसून धारदार शस्त्राचा धाक दाखवून शिवीगाळ केली. तसेच लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि.21) दुपारी एकच्या सुमारास फुरसुंगी येथे घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत निखिल दत्तात्रय कांबळे (वय-18 रा. फुरसुंगी) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन शिव कांबळे व त्याच्या इतर पाच ते सहा मित्रांवर आयपीसी 324, 323, 504, 506, 452, 143, 145, 147 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (दि.21) दुपारी एकच्या सुमारास फुरसुंगी पांडवदंड शितळादेवी मंदिरा जवळ तरुणाच्या राहत्या घरात घडला, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यामध्ये कॉलेजमध्ये वाद झाले होते. रविवारी फिर्यादी हा त्याच्या राहत्या घराच्या टेरेसवर पतंग उडवित होता. त्यावेळी आरोपी निखिल कांबळे याच्या घरात जबरदस्तीने घुसले. कॉलेजमध्ये झालेल्या जुन्या वादाचा राग मनात धरुन आरोपींनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन लाकडी दांडक्याने डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.