
युपीतील तरुणाकडून पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना
कोयत्याने गांधीजींच्या पुतळ्यावर वार, स्थानकाच्या नामांतरणावरून राजकारण करणारे नेते गायब, स्थानकाची सुरक्षा रामभरोसे
पुणे – पुणे रेल्वे स्थानकाबाहेर असणाऱ्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्यावर एका माथेफिरुने कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. याबद्दल संताप व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , सूरज शुक्ला नावाच्या उत्तर प्रदेशातील एका तरुणाने हे धक्कादायक कृत्य केले. त्याने हातात कोयता घेऊन पुतळ्यावर थेट हल्ला चढवला. या प्रकारामुळे रेल्वे स्थानक परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रविवारी रात्रीच्या सुमारास हातात धारदार कोयता घेऊन केशरी रंगाचा कुर्ता परिधान केलेला सूरज शुक्ला हा तरुण पुणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर आला. त्यानंतर तो महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ गेला. त्याठिकाणी असलेल्या चौथऱ्यावर चढला आणि तो गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने वार करू लागला. सूरज शुक्लाने महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या छातीवर आणि पायावर कोयत्याने जोरदार वार केले. यावेळी उपस्थित प्रवाशांनी घडलेला प्रकार पाहून तत्काळ रेल्वे पोलिसांना माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सूरज शुक्ला या तरुणाला चौथऱ्यावरून खाली उतरवून ताब्यात घेतले. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे पुतळ्याच्या डोक्यावर होणारा संभाव्य हल्ला टळला. सूरज शुक्ला हा मुळचा वाराणसी येथील आहे. तो नोकरीसाठी पुण्यात आला होता. तो रुद्राक्षांच्या माळा आणि धार्मिक पुस्तकं विकण्याचे काम करतो. उत्तर प्रदेशातील कुंभमेळा संपल्यानंतर तो महाराष्ट्रात मुक्कामाला आला होता. काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील वाईत वास्तव्याला होता. त्यानंतर तो पुण्यात आला आहे. सूरज शुक्लाच्या मानसिक स्थितीबाबतही तपास केला जात आहे. त्याने हे कृत्य आधीपासून नियोजित केले होते का? की अचानक मानसिक असंतुलनातून हे कृत्य घडले याचा शोध घेतला जात आहे. मध्यंतरी पुणे स्थानकाचे नाव बदलण्यावरुन मोठे राजकारण रंगले होते. पण स्थानकातील आहेत त्या महापुरूषांचे पुतळे सुरक्षित नाहीत तरीही केवळ आपल्या फायद्याचे राजकारण करणाऱ्या नेत्यांनाही हा प्रकार शरम आणणारा आहे.
या घटनेनंतर पुणे रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. देशाचे राष्ट्रपिता असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यावर सार्वजनिक ठिकाणी असे हल्ले होणे हे चिंतेचा विषय मानले जात आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.