
पैसे न दिल्याने तृतीयपंथीयांकडून तरुणाची हत्या
मारहाणीचा थरार कॅमेऱ्यात कैद, मृतदेह फेकला रेल्वेच्या बाहेर, लाथा मारत अंगावरती उड्या...
भोपाळ – पैसे देण्यास नकार दिल्याने तृतीयपंथीयांकडून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर तृतीयपंथीयांनी रेल्वेतून फेकून देत तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
आदर्श विश्वकर्मा असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. विदिशाजवळ ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श हा १५ मार्चच्या रात्र गोंडवाना एक्स्प्रेसमधून गंजबसौदाला येत होता. रांचीच्या आसपास रेल्वे आली असता तृतीयपंथीयांनी पैसे मागण्यास सुरुवात केली. यावेळी पैसे न देण्यावरुन तृतीयपंथी आणि आदर्शमध्ये वाद झाला. पण आदर्शने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्याने तृतीयपंथीयांनी निर्दयीपणे त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तृतीयपंथी त्याच्या अंगावर देखील उड्या मारत होते. यावेळी प्रवासी त्यांना थांबा असे सांगत होते, तरीही तृतीयपंथीयांनी त्याला बेदम मारहाण केली आहे. काहीवेळाने तो मेल्याचे माहित झाल्यावर तृतीयपंथीयांनी त्याला उचलून बाहेर फेकून दिले. त्यानंतर पोलिसांना रेल्वे ट्रॅकच्या जवळ आदर्शचा मृतदेहा आढळून आला. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. त्याचदरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे आरोपींना अटक होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. आदर्शच्या मृत्यूचे कारण पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे, असे पोलीसांनी सांगितले आहे.
रेल्वे गाड्यांमध्ये अनेकदा तृतीयपंथीयांकडून पैसे मागताना अरेरावी होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच मोठ्या गाड्यांमध्ये घोळक्याने असणारे तृतीयपंथी पैसे न देणाऱ्या व्यक्तीला धमकावत मारहाण करण्याच्या घटना घडल्या आहेत.