
यात्रा उत्सवाच्या ग्रामसभेत तरुणांची जेष्ठ नागरिकाला मारहाण
गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल, हा प्रश्न विचारल्याने तरुण संतप्त, तहसीलदारांसमोर मारहाण
पुणे – इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील भैरवनाथ यात्रा उत्सवाच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत जोरदार राडा झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
भिगवण येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यात्रेतील खर्चावरुन शंका उपस्थित केल्याने हा वाद झाला. यावेळी काही तरूणांनी गावातील जेष्ठ नागरिक बाबा धवडे यांना मारहाण केली आहे. भिगवण येथील यात्रेचे नियोजन मागील वर्षीपासून तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येत आहे. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली यात्रा कमिटीच्या माध्यमातून बँक खात्यातून खर्चाचे नियोजन केले जात आहे. यंदाही अशीच पद्धत ठेवून दोन दिवसांत वर्गणी संकलन करून नियोजन करण्याचे तहसीलदारांनी सांगितले होते. यावेळी जेष्ठ नागरिक बाबा धवडे यांनी यात्रा सोहळ्यावरील खर्चाबाबत शंका उपस्थित करत, हा सोहळा धर्मादाय आयुक्तालयाच्या प्रशासकाच्या माध्यमातून पार पडावा, अशी मागणी केली. त्यामुळे संतापलेल्या काही युवकांनी त्यांना मारहाण केली. यावेळी वाद सोडविण्यास गेलेल्या काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांनाही धक्काबुक्की सहन करावी लागली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित असताना हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
भिगवण हे गाव पुणे सोलापुर व अहमदनगर या तीन जिल्हे व पाच तालुक्यांच्या सिमारेषेवर असल्यामुळे या यात्रेला भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. तीन दिवस चालणाऱ्या यात्रेनिमित्त धामिर्क, प्रबोधन कार्यक्रम व कुस्त्याच्या आखाड्याचे आयोजन करण्यात येत असते.