Latest Marathi News
Ganesh J GIF

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे ! पालखी मार्गात उभारलेल्या फलकाची चर्चा..?

पुणे प्रतिनिधी – विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात वेगाने होत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे !’ असे फलक पालखी मार्गावर उभारत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पांडुरंगाला साकडे घातले आहे. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या सोहळ्यात विठ्ठलाची पूजा करण्याचा मान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे. मुख्यमंत्री सपत्निक विठ्ठलाची पूजा करतात. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या शिवाजीनगर मतदारसंघातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असे फलक पालखी मार्गावर उभारले आहेत. या फलकांची सध्या चर्चा सुरू आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेना नेते, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह बंडखोरी केली आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बदललेल्या राजकीय परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळेल, अशी चर्चा आहे. शिवाजीनगर मतदारसंघातील भाजप पदाधिकारी प्रकाश सोळंकी आणि रविंद्र साळेगांवकर यांनी हा फलक उभारला आहे.

‘हे माऊली तुझा कृपा आशीर्वाद सदैव राहू दे, तुझ्या पंढरपूरच्या पूजेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे !’ असा मजकूर या फलकावर असून देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता यांचे विठ्ठलाची पूजा करतानाचे छायाचित्र फलकावर दिसत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!