
मुंबई प्रतिनिधी – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे ३३ तर अपक्ष सात अशा एकूण ४० आमदारांना सोबत घेऊन सुरतहून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले आहे. या घटनेनंतर शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. मुंबई महापालिकेतील सत्ताकारणात ऑक्टोबर २०१७ मध्ये मनसेच्या ७ पैकी ६ नगरसेवक फोडून शिवसेनेनं महापालिकेतली सत्ता टिकवण्यासाठी खेळी खेळली होती. त्यावेळी राज ठाकरे शिवसेनेला उद्देशून बोलतानाचा हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होऊ लागलाय. ‘वेळ प्रत्येकाची येते!’ असं या व्हिडीओमध्ये लिहिण्यात आलंय.
‘राजसाहेबांच्या कठीण काळात उद्धव ठाकरेंनी नीच राजकारण करून मनसेचे ६ नगरसेवक फोडले, आज त्यांच्याच अख्खा पक्ष फुटण्याच्या मार्गावर आहे, वेळ प्रत्येकाची येते उद्धवजी…’ असं या व्हिडीओमध्ये लिहिण्यात आलंय. मुंबई महापालिकेच्या सत्ताकारणाच्या वेळी शिवसेनेने मनसेचे ६ नगरसेवक फोडल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांची प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळचा हा व्हिडीओ आहे. “मी शिवसेनेतून ज्या वेळेला बाहेर पडलो, त्यावेळी सुद्धा मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो होतो. हे उद्धव वगैरे आहेत ना त्यांच्या या नीच राजकारणाचा मला कंटाळा आला होता, म्हणून मी बाहेर पडलो. मी जेव्हा बाहेर पडलो, तेव्हा शिवसेनेतील अनेक आमदार, नगरसेवक माझ्यासोबत बाहेर पडायला तयार होते, पण तेव्हा मी सांगितलं होतं, की मला पक्ष फोडून माझा पक्ष उभारायचा नाही. या गोष्टी मला करायच्या नाहीत, मी करणारही नाही. पक्ष स्थापनेच्या वेळीही, कोणालाही विचारुन बघा, मी एकालाही फोनही केला नव्हता. त्यानंतर मी बाहेर पडल्यावर जे प्रेमाने येतील, ते माझ्यासोबत राहतील. त्यामुळे असलं घाणेरडं राजकारण मी कधी केलं नाही, करणारही नाही” असं राज ठाकरे या व्हिडीओमध्ये दिसून येत आहेत.
बघा व्हिडीओ