
जळगाव प्रतिनिधी – ‘तुम्ही आता नुसते दात कोरत बसा, तुमची तर किंमत संपली. तुम्हाला विचारलं का कुणी, तुम्ही फक्त त्यांचे बोर्ड लावा, सतरंज्या झटका आणि मरा, तुम्हाला अशी लाजबिज वाटत नाही का? असं म्हणत लोकप्रिय किर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडावरून कार्यकर्त्यांचे कान उपटले.
चाळीसगावमध्ये भाजपचे खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इंदोरीकर महाराज यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी इंदोरीकर महाराज यांनी राजकीय घडामोडीवर जोरदार बॅटिंग केली. ‘फक्त लोभ नावासाठी अख्खी मंडळी १५ दिवस एकत्र आली. खुर्चीच्या लोभासाठी विरोधकही एकत्र आले, सगळे एकत्र आहे. कुणीही काही बोलायला तयार नाही. आपल्या गावातलं कुणी नाही, नाहीतर गेलो असतो लग्नाला. ते कसे रंगले आहे आता, मस्त निवडणुका काढल्या. शिका त्यांच्याकडून आता कुणी म्हणेल का हे विरोधक आहे का? तुम्ही आता नुसते दात कोरत बसा, तुमची तर किंमत संपली. तुम्हाला विचारलं का कुणी, असं काही करतो म्हणून. तुम्ही फक्त त्यांचे बोर्ड लावा, सतरंज्या झटका आणि मरा, तुम्हाला अशी लाज वगैरे नाही का? असं म्हणत इंदोरीकर महाराज यांनी कार्यकर्त्यांचेही कान उपटले.