Latest Marathi News
Ganesh J GIF

शरद पवारांची राज्यसभेची जागा धोक्यात ? बघा सविस्तर बातमी

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर आता राजकीय वर्तुळात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांची चर्चा तापली आहे. विशेषतः एप्रिल २०२६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राज्यसभा कार्यकाळ संपत असल्याने त्यांच्या पुनर्निवडीची शक्यता जोर धरत आहे.गेल्या काही दिवसांत ते रुग्णालयात असल्याने प्रकृतीच्या कारणाने ते उमेदवारी सोडतील की पुन्हा लढतील, याबाबत उत्सुकता आहे.

मात्र, महाविकास आघाडीतील एका राज्यसभा जागेवर तीनही पक्षांकडून दावा केला जात आहे. आदित्य ठाकरेंनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. वरुण सरदेसाई म्हणाले, “राज्यसभेच्या जागेसाठी कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमचा दावा सोडणार नाही. आमच्या पक्षातील आमदारांनी उद्धव ठाकरेंसमोर हे मत मांडले आहे. २०२० मध्ये आम्ही राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांच्या उमेदवारीला मदत केली होती. त्यानंतर संजय पवार आमचे उमेदवार असताना आणि संख्याबळ असतानाही ते पराभूत झाले. आता संख्याबळानुसार आमचे बळ अधिक आहे. म्हणूनच आमचा खासदार कार्यकाळ पूर्ण करत असेल तर आमच्याच पक्षाचा उमेदवार राज्यसभेवर जाईल.”

ते पुढे म्हणाले, “शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यांना उमेदवार म्हणून इच्छा असेल आणि त्यांच्या नेत्यांकडून किंवा महाविकास आघाडीकडून तसे बोलले गेले तरीही आम्ही राज्यसभेच्या जागेसाठीचा दावा सोडणार नाही.” वरुण सरदेसाई यांनी विधान परिषद आणि राज्यसभा या दोन वेगळ्या जागा असल्याचेही स्पष्ट केले. “विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असल्याने ती जागा अर्थातच आमची असेल,” असे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीकडून राज्यसभेच्या जागेवर चर्चेसाठी दोनवेळा बैठक बोलावली गेली होती, मात्र आदित्य ठाकरे त्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. राज्यसभेची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावी यासाठी आदित्य ठाकरे ठाम असून, विधानभवनातील बैठकीला फक्त शरद पवार गट आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी बैठकीला दांडी मारली.

महाराष्ट्रातील एकूण सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२६ रोजी संपत आहे. यात शरद पवार (राष्ट्रवादी-शरद पवार गट), रामदास आठवले (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), डॉ. भागवत कराड (भाजप), धैर्यशील मोहन पाटील (भाजप), प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे), रजनी पाटील (काँग्रेस) आणि डॉ. फौजिया खान (राष्ट्रवादी-शरद पवार गट) यांचा समावेश आहे. या जागांसाठीची रस्सीखेच आता तीव्र झाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!