बारावीच्या निकालाची तारीख ठरली, २५ मेला निकाल
विद्यार्थ्यांना या वेबसाईटवर पाहता येणार निकाल, वेळही जाहीर,विद्यार्थ्यांनो बेस्ट आॅफ लक
पुणे दि २४(प्रतिनिधी)- पालक आणि विद्यार्थी ज्याची उत्सुकतेने वाट पाहत होते. त्या बारावी निकालाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल २५ मे म्हणजेच उद्या जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या होत्या. परीक्षेच्या वेळेस झालेल्या संपामुळे निकाल वेळेवर लागणार की नाही याची अनेकांना शंका होती. पण आता बोर्डाकडून निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर २६ मे पासून ५ जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २६ मे ते १४ जून दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर गुणपत्रिका ५ जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहेत. यंदाच्या वर्षी १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. दरम्यान मधल्या दोन वर्षाच्या कोविड काळात विद्यार्थ्यांना परीक्षा देता आल्या नव्हत्या. कोरोना महामारीनंतर सर्व सुरळीत झाल्यानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन वर्ग घेऊन बारावीची परीक्षा पार पडली होती. बारावीची ही परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ ते २१ मार्च २०२३ दरम्यान घेण्यात आली होती. दुपारी दोन नंतर हा निकाल पाहता येणार आहे.
विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहण्यासाठी विविध वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. परीक्षांचे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळाला भेट देणं अपेक्षित असेल. त्यासोबतच http://mahresult.nic.in, http://hscresult.mkcl.org किंवा http://mahresults.org.in या लिंकवर जाऊनही निकाल पाहू शकतात.