
राज्यात होणार नवीन २० जिल्हे आणि ८१ तालुक्यांची निर्मिती
एका जिल्ह्याच्या निर्मितीसाठी येणार एवढ्या कोटींचा खर्च, यावेळी होणार निर्मिती, सरकारचा नेमका प्लॅन काय?
मुंबई – : महाराष्ट्रातील प्रशासकीय रचना बदलण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. राज्यात तब्बल २० नवीन जिल्हे आणि ८१ तालुके निर्माण करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर आल्याची माहिती समोर आली आहे. पण ही सर्व प्रक्रिया होण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
महाराष्ट्रात सध्या ३६ जिल्हे आणि ३५७ तालुके आहेत, जे सहा विभागांत विभागले गेले आहेत (कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती). नवीन जिल्हे आणि तालुके निर्माण करण्याची मागणी गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. पण आता या विषयी महसूलमंत्री बावनकुळे यांनी यांनी अधिकृत माहिती दिली आहे. मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत २०२१ ची जनगणना होऊन तिचा अहवाल येत नाही, तोपर्यंत नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीवर कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. २०२१ ची जनगणना, भौगोलिक स्थिती आणि सीमांकन झाल्यानंतरच जिथे गरज आहे तिथे जिल्हा व तालुक्याची निर्मिती केली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नवीन जिल्हा निर्माण करण्यासाठी प्रति जिल्हा किमान ३५० ते ५०० कोटी रुपयांचा खर्च येतो, ज्यात मुख्यालयाची जागा, इमारती, कर्मचारी आणि प्रशासकीय सुविधा यांचा समावेश असतो. त्यानुसार नवीन जिल्ह्यांमुळे राज्याच्या बजेटवर आर्थिक भार पडतो. २० जिल्ह्यांसाठी ७,००० कोटींपेक्षा जास्त येण्याची शक्यता आहे. मध्यंतरी जानेवारी महिन्याच्या आधी सोशल मीडियावर नवीन जिल्ह्यांबाबत काही मेसेज व्हायरल होते. २६ जानेवारी २०२५ ला नवीन जिल्ह्यांची घोषणा केली जाणार असल्याचा मेसेज व्हायरल होत होता. परंतु ते मेसेज खोटे असल्याचं नंतर निदर्शनात आले होते.
महाराष्ट्रात सध्या ३६ जिल्हे आहेत, नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे प्रशासनात सुलभता येत स्थानिक विकासाला गती मिळत असते. पण या प्रक्रियेसाठी आर्थिक भार आणि प्रशासकीय अडचणी येत असतात, त्या दूर होण्यास मदत होणार आहे.