
मुंबई दि २५ (प्रतिनिधी)- राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. कालच्या हाणामारीच्या घटनेचे पडसाद आज विधानभवनाच्या पाय-यावर उमटल्याचे दिसून आले. आजही विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला.
त्यामुळे विरोधाची भूमिका आजही असल्याचे दिसून आले.
पन्नास खोके, चिडलेत बोके… ओला दुष्काळ जाहीर करा… नाहीतर खुर्च्या खाली करा… महाराष्ट्र के गद्दारों को, जुते मारो सालों को… गुंडगिरी दडपशाहीने विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्या सरकारचा धिक्कार असो… ईडी सरकार हाय हाय… पैसा आमच्या जनतेचा, नाही कुणाच्या बापाचा… शेतकऱ्यांना वार्यावर सोडणाऱ्या सरकारचा निषेध असो… गद्दार सरकारचा निषेध असो… सातवा वेतन न देणार्या सरकारचा धिक्कार असो… एसटी कर्मचाऱ्यांना वार्यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… बलात्काऱ्यांचा सत्कार करणार्या सरकारचा धिक्कार असो… अशा गगनभेदी घोषणा देत आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर शिंदे सरकारचा निषेध केला. यावेळी विरोधकांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीमधील सर्व आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.त्यामुळे या अधिवेशनावर पूर्णपणे विरोधकांचा प्रभाव दिसून आला आहे.