आदिकांची बदनामी भोवली, भाजप नेत्याच्या दणका
एक कोटीची नुकसान भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश, भाजप नेता अडचणीत
श्रीरामपूर दि २९(प्रतिनिधी)- श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दिवानी न्यायाधीशांनी भाजप नेते प्रकाश चित्ते यांना दणका दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार चित्ते यांना आदिकांना एक कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. न्यायाधीश व्ही. बी. कांबळे यांनी हा आदेश दिला. न्यायालयाच्या या निकालामुळे, चित्ते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळाप्रकरणी जनतेमध्ये आपल्याबद्दल अपप्रचार करुन बदनामी केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी भाजपचे प्रकाश चित्ते यांच्याविरोधात येथील दिवाणी न्यायालयात मे २०२१ मध्ये अवमान याचिका दाखल केली होती. चित्ते यांच्याविरोधात आदिक यांनी २०२१ मध्ये ५ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचा दावा केला होता. त्याची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने हा आदेश दिला आहे. चित्ते यांनी आदिक यांची बदनामी केल्याचं सिद्ध होत असल्याने एक कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश विनय बी. कांबळे यांनी दिला आहे. यावेळी आदिकांविरूध्द खोटेनाटे आरोप करण्यात आले. त्याला कोणताही आधार नाही, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. न्यायालयाने साक्षीदारांची तपासणी केली. त्यानंतर हा निकाल देण्यात आला. दरम्यान, आदेशाची प्रत अद्याप वाचलेली नाही. वकिलांच्या मार्गदर्शनाखाली त्याविरूध्द वरिष्ठ न्यायालयात अपील करू, असे चित्ते यांनी सांगितले आहे. शिवाजी महाराज चौकात काही लोकांनी नियमबाह्य पद्धतीने पुतळा आणून बसवला. त्यामुळे कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी तो पुतळा तिथून हटवला. परंतु, अनुराधा आदिक यांचा काहीही संबंध नसताना, त्यांच्यावर खोटे आरोप करत, त्यांची बदनामी करण्यात आल्याचं तुषार आदिक म्हणाले आहेत.
श्रीरामपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी चौकात बसवण्याच्या प्रकरणातून हा वाद निर्माण झाला होता. त्यावर्षीच्या शिवजंयतीला यावरुन आंदोलन झाले होते. त्या आंदोलनात सहभाग घेतलेले चित्ते यांनी पत्रकारांशी बोलताना आदिक यांच्याविरोधात आरोप केले होते. पुतळ्याची जागा तत्कालीन नगराध्यक्ष आदिक यांच्याकडून बदलण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप चित्ते यांनी केला होता.