मोठी बातमी! शरद पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त
कार्यकर्त्यांचा जोरदार विरोध, निर्णय मागे घेण्याची विनंती, नेत्यांचा अश्रू अनावर, मनधरणी सुरु
मुंबई दि २(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडुन निर्णय मागे घेण्याचोइ विनंती करण्यात येत आहे. पण यामुळे पुन्हा एकदा पवारांची पाॅवर दिसून आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन आज मुंबई येथे होत आहे. यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. यावेळी आपण निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले होते. काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी योग्य वेळी भाकरी फिरवावी लागते, ती नाही फिरवली तर ती करपते, असं सूचक विधान केले होते. आज त्यांनी भाकरी फिरविण्याची सुरुवात स्वत:पासून केली आहे. पण पक्षातील सर्वच नेत्यांनी त्यांना निर्णय परत घेण्याची विनंती केली आहे. आपण निर्णय मागे न घेतल्यास आपणही राजकीय निवृत्ती जाहीर करणार असल्याचे जयंत पाटील यांनी भावुक होत जाहीर केले आहे.गेले काही दिवस राजकीय वर्तुळात अजित पवार भाजपमध्ये जाणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये चर्चा होत असल्याचं म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर पवारांनी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडणं यामुळे नव्या चर्चेला सुरूवात झाली आहे.शरद पवारांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार अशी घोषणा करताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. तुम्ही ही घोषणा मागे होत नाही तोवर आम्ही सभागृह सोडणार नाही असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे. दरम्यान शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार, शरद पवार अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. यावेळी कार्यक्रत्यांना अश्रू देखील अनावर झाले. इतकंच नाही तर धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्या पाया पडून निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.
‘महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेने 56 वर्षं मला सत्तेच्या राजकारणात ठेवलं. अजूनही माझी राज्यसभेची तीन वर्षं बाकी आहेत. इतकी संधी आजपर्यंत कोणालाही मिळालेली नाही. इतकी वर्षं सतत लोकसभा, राज्यसभेत असणारी व्यक्ती मला पाहायला मिळालेली नाही. करुणानिधी हे एकमेव आहेत, ज्यांचा इतका मोठा कालखंड होता. अडवाणी, वाजपेयी यांना पराभव पाहावा लागला होता. महाराष्ट्राच्या जनतेने मला कधी पराभल दाखवला नाही. ६३ वर्षांपासून माझा प्रवास सुरु असून यातील ५६ वर्ष सत्तेत आहे,’ असं शरद पवारांनी सांगितलं आहे.