जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांचा खून
तळेगाव हादरले, हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर, भरदिवसाच्या हल्ल्यामुळे दहशत
पुणे दि १२(प्रतिनिधी)- जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाला असून, या हल्ल्यात आवारे यांचा मृत्यू झाला आहे. अज्ञात हल्लेखोरांचा शोध पिंपरी चिंचवड पोलिस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे हे नगरपरिषदेच्या कार्यालयातून बाहेर आले. त्यावेळी तिथेच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी आवारे यांच्यावर हल्ला केला. कोयत्याने त्यांच्यावर वार करण्यात आले. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आवारे यांच्यावर नेमका कोणी आणि का हल्ला केला, हे अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन खाली आले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या ४ जणांनी त्यांच्यावर खूनी हल्ला केला आहे. त्यापैकी दोघाजणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तर दोन जणांनी कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर काहीवेळ तिथेच थांबून होते. आवारे यांनी तळेगावात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाशी दांडगा जनसंपर्क बनवला होता. सहा वर्षांपूर्वी झालेल्या तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत जनसेवा विकास समितीचे नगरसेवक निवडून आणून किशोर आवारे यांनी राजकारणात देखील आपले वजन वाढवले होते.
काही दिवसांपूर्वी जुना पुणे- मुंबई महामार्गावरील टोल नाका नागरिकांसाठी टोलमुक्त व्हावा यासाठी ते प्रयत्न करत होते. नागरिकांना एकत्र करून टोलच्या विरोधात त्यांनी आंदोलन छेडले होते. या त्यांच्या लढ्याला काहीसे यश देखील आले होते. आता पोलीसांसमोर तपासाचे आव्हान आहे.