लोणी काळभोरचे पीएसआय वैभव मोरे यांच्या निलंबनाची मागणी
संतोष भोसले यांचे पोलिसांना निवेदन, कारवाई न केल्यास दिला ठिय्या आंदोलनाचा इशारा
पुणे दि १९(प्रतिनिधी)- लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत भोसले चाळ येथे अल्पवयीन मुलास पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी संतोष बाबुराव भोसले यांनी केला आहे. त्यांनी पोलिसांदेखील याबाबत तक्रार दिली आहे.
लोणी काळभोर मध्ये दोन दिवसापुर्वी म्हणजे १६ मे रोजी संतोष भोसले हे त्यांच्या घरासमोर पुतण्या शिवराज भोसले आणि इतर जणांसोबत वाढदिवसानिमित्त केक कापत होते. या कार्यक्रमासाठी अल्पवयीन मुले तसेच महिलाही हजर होत्या. त्याचवेळी पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे आणि त्यांचे चार सहकारी पोलिसांच्या वाहनातून घटनास्थळी आले. पोलिसांनी गाडीतून उतरताच केक कापणाऱ्या नागरिकांना आणि अल्पवयीन मुलांना समज देण्याऐवजी हातातील काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी मुलांना मारहाण करु नये यासाठी काही महिलांनी पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वैभव मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महिलांना देखील शिवीगाळ करण्याबरोबरच दिसेल त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला होता. याबाबत संतोष भोसले यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे. त्यामध्ये त्यांनी पोलीस उपनिरिक्षक वैभव मोरे, त्यांचे सहकारी देविकर आणि राठोड यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. पण अद्यापही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे भोसले यांनी पुन्हा एकदा कारवाईची मागणी केली आहे पण तरीही पोलीसांनी कारवाई न केल्यास २१ मेला गावबंद आणि ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता चांगलेच तापले आहे.
राज्याच्या अंतर्गत कायदा सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. मात्र, पोलिसांनीच शांतता भंग केल्याचा दावा भोसले यांनी केला आहे. मोरे आणि सहका-यांचे निलंबन करुन अन्याय झालेल्या तरूणांना न्याय देण्याची मागणी भोसले यांनी केली आहे. त्यामुळे पोलीस कारवाई करणार? की भोसलेंना आंदोलन करावे लागणार? हे पहावे लागणार आहे.