मुंबई दि १०(प्रतिनिधी)- राज्यात पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन अनेक आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे हे आमदार आता पुन्हा एकदा ‘मातोश्री’च्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अनेक राजकीय घडामोडीनंतर अस्तित्वात आलेल्या शिंदे सरकारमध्ये बहुप्रतिक्षित विस्तारानंतर नाराजीची चर्चा उघडपणे होऊ लागली आहे. तर काही आमदारांना आता पुन्हा एकदा स्वत्वाची ओढ लागली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा सत्तासंघर्ष रंगण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार एकाच टप्प्यात करावा अशी मागणी एकनाथ शिंदे गटातील आमदारांची होती. मात्र, भाजपाच्या दबावामुळे तो आता दोन टप्प्यात होणार आहे.त्यात पहिल्या टप्प्यात संधी न मिळाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बच्चू कडू यांनी आपली नाराजी उघड करताना एकनाथ शिंदेंसोबत पहिल्यांदा गेलेल्या आमदारांना वगळून नंतर गेलेल्या आमदारांना मंत्री पद देण्यात आल्यामुळे नाराजी व्यक्त केली. कडू यांनी यामुळे काही आमदार नाराज असल्याचे स्पष्ट केले होते.त्याचबरोबर अनेक आमदारांनी शिवसेना पक्ष ठाकरेंच्या हाती कायम रहावा अशी इच्छा आहे पण शिवसेना पक्ष,चिन्ह काबीज करण्याचा प्रयत्न शिंदे गटातील काही आमदारांना मान्य नाही. तर काही आमदारांना भाजपात विलीनीकरण करण्याचा पर्याय मान्य नाही. शिवाय मंत्रिमंडळ विस्तारात आवडीची खाती मिळणार की नाहीत याची शाश्वती नसल्याने शिंदे गटात नाराजीचा सूर पसरू लागला आहे.
सुरत, गुवाहाटी, गोवा असा प्रवास करत स्थापन झालेल्या शिंदे सरकारमधील नाराजी आता उघड होऊ लागली आहे. त्यामुळे आपले राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी काही आमदारांनी पुन्हा एकदा मातोश्रीवर संपर्क केला आहे. त्यामुळे भाजपाशी जुळवून घेताना एकनाथ शिंदे यांना आपल्या गटातील आमदारांना संभाळण्याची कसरत करावी लागणार आहे.