नाशिक- लाचखोर सुनीता धनगरकडे कोट्यवधीची संपत्ती
नाशिकमध्ये एसीबीने मोठी कारवाई केली. नाशिक महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना ५० हजारांची तर लिपिकाला ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. यात कोट्यवधी रुपयांची संपत्ती सापडली.
८५ लाख रोख, ३२ तोळे सोने खाणार होती का?
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तब्बल ८५ लाख रुपये रोख रक्कम आणि ३२ तोळे सोनं अशी मालमत्ता आढळली आहे. नाशिक एसीबीने जानेवारीपासून ते आतापर्यंतच्या केलेल्या कारवाईत ही सर्वात जास्त रक्कम आढळून आलीय. तसेच सुनीता धनगर यांच्या नावावर दोन फ्लॅट आणि एक प्लॉट असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.
दोन फ्लाट आणि तिसरा फ्लॅट
सुनिता धनगर हिचा एक फ्लॅट टिळकवाडी आणि दुसरा फ्लॅट उंटवाडी येथे, तर प्लॉट आडगाव येथे असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी दिली. तसेच लिपिक नितीन जोशी याच्या घराचे देखील झडती घेण्यात आली. मात्र त्यात काहीही आढळून आले नाही.
काय आहे प्रकरण?
नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली. तक्रारदार निलंबित मुख्याध्यापकाला कामावर रुजू करायचे होते. त्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी ५० हजार रुपये लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर हिने मागितले. याप्रकरणी धनगर हिला ४५ हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले.