पुणे : झोपण्यावरुन झालेल्या वादात एकाने दुसर्याच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून त्याला पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे
या घटनेमध्ये मिलिंद सिद्धपा होसकुटी (वय३८, रा. इंदिरानगर वसाहत, खडकी) हे भाजले आहेत. विश्रामबाग पोलिसांनी बालमुकुंद पंडीत (वय ५९, रा. बिबवेवाडी) याला अटक केली आहे. हा प्रकार शनिवार पेठेतील मुठेश्वर मंदिराच्या वर असलेल्या वाचनालयात सोमवारी मध्यरात्री पाऊण वाजता घडला.
नेमकं काय घडलं?
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ते फिरस्ते आहेत. फिर्यादी यांना रविवारी रात्री घरी जाण्यास उशीर झाल्याने ते मुठेश्वर मंदिरात झोपण्यासाठी आले होते. त्या ठिकाणी झोपण्यावरुन त्यांचा पंडित याच्याशी वाद झाला. तेव्हा पंडितने त्याला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा फिर्यादी हे बाजूला असलेल्या वाचनालयात जाऊन झोपले. ते झोपेत असताना पंडित याने त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला आग लावून दिली. त्यात त्यांच्या छातीला व हाताला भाजले आहे. शेजारील बॅनरही जळून गेला. याप्रकरणी पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पंडित याला अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक निकुंभ करीत आहेत.