‘भाजपाने आम्हाला गृहीत धरू नये, त्या २३ जागा आमच्याच’
मंत्री तानाजी सावंत यांचा भाजपाला इशारा, लोकसभेच्या जागा वाटपावरुन युतीत वाद होणार?
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- शिवसेना आणि भाजप युतीत मुख्यमंत्री जरी शिवसेनेचा असला तरीही भाजपाकडुन सातत्याने शिवसेना म्हणजेच शिंदे गटावर दबाव टाकण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे ब-याचवेळा वादाचे प्रसंग ओढावले आहेत. पण आता शिंदे गटाकडून भाजपाला थेट इशारा देण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी थेट भाजप नेतृत्वाला इशारा दिला आहे. त्यामुळे युतीत बेबनाव होण्याची शक्यता आहे.
तानाजी सावंत यांनी भाजपाने आम्हाला गृहीत धरु नये असा इशारा दिला आहे. सावंत म्हणाले, मागच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने २३ जागा लढविल्या होत्या. त्या पूर्ण जागा यावेळीही आम्हीच लढवू, यावर आम्ही ठाम आहोत. आमच्या शिवसेनेले कुणी गृहीत धरण्याचा प्रयत्न करू नये, मागील निवडणुकीत २३ पैकी १८ जागांवर आम्ही विजयी झालो होतो. या जिंकलेल्या जागा तर लढवणारच पण पराभव झालेल्या जागाही आम्ही सोडणार नाही. धाराशिव लोकसभेची जागा सुद्धा आम्हीच लढविणार आहोत. असे सावंत यांनी स्पष्ट केले. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत लोकसभेतील जागा वाटपाच्या मुद्यावर चर्चा करत आहेत. राज्यात कोणता पक्ष कोणती जागा लढवणार याची चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच तानाजी सावंत यांनी असे विधान केल्याने जागावाटपावरून वाद होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही. पण जागा वाटपाच्या मुद्यावरून महाराष्ट्रात आतापासूनच सर्व राजकीय पक्षांमध्ये धूसफूस सुरू असल्याचे चित्र आहे.
काही दिवसांपूर्वी भाजप नेते राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिवमध्ये आपल्या हक्काचा खासदार हवा असे वक्तव्य केले होते. यातुन त्यांनी भाजपाकडुन निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यांच्या याच वक्तव्यावर सावंत यांनी प्रत्युत्तर देत धाराशिव लोकसभा शिवसेनेकडेच राहिल असे स्पष्ट केले आहे. यामुळे जागा वाटपावरून काय होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.