हडपसरमध्ये पतीनेच पत्नीला उतरवले वेश्याव्यवसायात
फक्त तीन हजार रुपयांसाठी पत्नीला मित्राकडे सोपवले, सांस्कृतिक पुण्यात चाललयं काय? आरोपी अटकेत
पुणे दि २३(प्रतिनिधी)- पुण्यात गुन्हेगारी वाढत आहे. त्यात नात्यांना काळीमा फासणाऱ्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच सांस्कृतिक पुण्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. एका पतीनचे केवळ तीन हजार रुपयांसाठी पत्नीला वेश्याव्यवसायात उतरवल्याची धक्कादायक घटना हडपसरमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीला आणि पतीच्या दोन मित्रांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी २५ वर्षांच्या पत्नीने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती आणि त्याचे दोन मित्र आदित्य गौतम आणि सुजित पुजारी यांना अटक केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला ही तिच्या पती सोबत उंड्री येथे राहायला आहे. दरम्यान, तिच्या पतीने पैशाच्या लालसेपोटी पत्नीला मारहाण करून तिला जबरदस्तीने वेश्याव्यवसायात उंड्री हांडेवाडी रस्त्यावर उभे केले होते. गेल्या तीन वर्षांपासून म्हणजे डिसेंबर २०२० पासून हा संपूर्ण प्रकार सुरू होता. एवढ्यावरच न थांबता नराधम पतीने त्याच्या दोन मित्रांनाच ग्राहक बनवून प्रत्येकी तीन हजार रुपये घेत पत्नीला त्यांच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यास बळजबरी केली होती. त्याच्या दोन्ही मित्रांनी तिच्यासोबत इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर देखील ते मित्र महिलेला त्रास देत होते. काही दिवसांपूर्वी ही महिला रास्ता पेठ परिसरातून जात असताना तिच्या पतीच्या मित्रांनी तिचा रस्ता अडवला होता. तिला जातीवाचक शिवीगाळ केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे तिने थेट पोलिस ठाणे गाठत पती आणि त्याच्या दोन्ही मित्रांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी लगेच कारवाई करत तिघांना अटक केली आहे. पैशाच्या हव्यासापोटी पतीने आपल्या पत्नीला वाममार्गाला लावल्याचे समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे.
हडपसरमध्ये काही दिवसांपूर्वी पतीसमोरच पत्नीवर अत्याचार केल्याचं समोर आले होते. इतकेच नाही तर या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ तयार करुन हा व्हिडीओ आरोपीने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यावेळी देखील मोठी खळबळ उडाली होती. तसेच काही दिवसापूर्वी एका महिलेनेच अल्पवयीन मुलाबरोबर शरीरसंबंध ठेवल्यावर समोर आले होते. त्यामुळे पुण्यात काय सुरु आहे असे सवाल उपस्थित होत आहे.