सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात?
अजित पवारांच्या पत्नी बारामती लोकसभा मतदारसंघातून लढणार, नणंद भावजयीच्या लढतीत कोणाची सरशी?
पुणे दि २६(प्रतिनिधी)- बारामती हा पवारांचा गड समजला जातो. १९६२ पासून या ठिकाणी पवारांचे वर्चस्व आहे. त्यामुळेच पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार असे समीकरण घट्ट झाले आहे. शरद पवार, आणि आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे इथून आमदार आणि खासदार आहेत. भाजपाने अनेक प्रयत्न करूनही त्यांना बारामती जिंकता आलेली नाही. पण आता थेट अजित पवार यांनाचा आपल्याकडे ओढत भाजपाने मोठी खेळी खेळली आहे. त्यामुळे आता बारामती सुप्रिया सुळे यांना विजयासाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यातच पक्षाबरोबर आता पवार कुटुंबातही वादाची ठिगणी पडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
भाजपाने काहीही करुन बारामती जिंकायची असा निश्चय केला आहे. त्यामुळे तेथून पवार घरातीलच उमेदवार देण्याची व्यूहरचना आणखी जात आहे. सुरूवातीला पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याविषयी चर्चा झाली होती. पण मावळमध्ये झालेला पराभव आणि सुप्रिया सुळेंसमोर कमी पडणारा अनुभव यामुळे त्यांचे नाव मागे पडले. आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. सुप्रिया सुळे २००९ पासून बारामतीच्या खासदार आहेत. २०१४ च्या मोदी लाटेतही त्यांनी आपला गड राखला होता. पण बारामती कोणाची यावरून आता शरद पवार आणि अजित पवार यांच्यातच तगडी लढत होणार आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नणंद भावजयीच्या लढत झाली तर कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान सुनेत्रा पवार या एन्व्हायरमेंटल फॉर्म ऑफ इंडिया, हायटेक टेक्स्टाईल पार्क कापड उद्योगांसह अनेक संस्थात त्यांचा वावर आहे. या उद्योगामुळे अनेक कुटुंबातील महिलांना रोजगार मिळाला आहे. त्याचबरोबर विद्या प्रतिष्ठाण आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठात सिनेट सदस्य, असलेल्या सुनेत्रा पवार यांचा बारामती विधानसभा मतदारसंघात मोठा प्रभाव आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की, पार्थ पवार आणि जय पवार यांना राजकारण सक्रिय करणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढणार असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारला असता सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचे स्वागत केलं आहे. तर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी हे अजित पवार निश्चित करतील असे सांगितल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पण सुप्रिया सुळे यांच्यासमोर सुनेत्रा पवार असणार? की आणखी कोणी? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.