
मुंबई दि १८ (प्रतिनिधी)-मुंबईत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी आले रे आले ५० खोके. ५० खोके, एकदम ओके’. ‘ईडी सरकार हाय हाय’ च्या घोषणा दिल्या होत्या. या घोषणाबाजीमुळे एकनाथ शिंदे दुखावले गेल्याच्या बातम्या आल्या होत्या.पण अधिवेशनाच्या दुस-या दिवशीही विरोधकांनी सत्ताधा-यांविरोधात शेलक्या शब्दात घोषणाबाजी करत टिका केली आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे जून महिन्यात बंडखोर आमदारांसोबत गुवाहाटीला होते. याच मुद्द्यावरुन विरोधकांनी आज शिंदे गटावर निशाणा साधला.ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा…’, ‘ईडी सरकार हाय हाय..’, ‘फसवी मदत जाहीर करणार्या सरकारचा धिक्कार असो…’, ‘नही चलेगी… नही चलेगी दादागिरी नही चलेगी…’, ‘सरकार हमसे डरती है ईडी को आगे करती है…’, ‘फिफ्टी- फिफ्टी… चलो गुवाहटी…’, ‘गद्दारांना भाजपाची ताट – वाटी… चलो गुवाहाटी… चलो गुवाहाटी…’ अशा घोषणा देत महाविकास आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर आजही दणाणून सोडला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून घोषणाबाजी करणाऱ्या आमदारांमध्ये छगन भुजबळ, अजित पवार, आदित्य ठाकरे, प्रणिती शिंदे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, वर्षा गायकवाड हे आमदार उपस्थित होते.
शिवसेनेतून बंडखोरी करुन बाहेर पडलेले ४० आमदार आणि १० अपक्ष आमदारांनी ५० कोटी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. याच आरोपाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी विधानभवनाच्या पाय-यावर ५० खोक्यांची घोषणाबाजी चर्चेत होती पण आज ताट वाटी गुवसहाटी घोषणाबाजी त्यावर कडी करत सरकारची कोंडी केली आहे.