अजित पवारांच्या प्रश्नावर ‘हा’ मंत्री क्लिनबोल्ड
प्रश्नांची उत्तरे देताना नव्या मंत्र्यांची उडतेय भंबेरी
मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा दिवस विरोधकांनी घोषणाबाजीमुळे दणाणून सोडल होता. तर विधिमंडळातही अजित पवार यांनी शिंदे सरकारची कोंडी केली. पवारांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना पटलावर नसलेला प्रश्न विचारल्याने सावंतांची चांगलीच भंबेरी उडाली.
अजित पवार यांनी पटलावर नसलेला प्रश्न विचारत सावंत यांची कोंडी केली. तर दुसऱ्या एका प्रश्नावर बोलताना तानाजी सावंत यांनी वापरलेल्या ‘फेमस’ या शब्दामुळेही सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. अजित पवारांनी पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या एकूण जागा, रिक्त जागा आणि भरलेल्या जागा याची माहिती द्या, असा प्रश्न विचारला. अजित पवारांनी पटलावर नसलेला प्रश्न विचारल्यामुळे नव्याने मंत्री झालेल्या तानाजी सावंत यांच्याकडे माहिती नव्हती आणि तारांबळ उडाली. त्यावेळी अध्यक्षांनी हस्तक्षेप करत वेळ मारून नेली. तर गर्भपाताच्या घटनांमुळे बीड जिल्हा हा फेमस आहे, असं उत्तर तानाजी सावंत यांनी दिलं, पण फेमस म्हणजे लोकप्रिय या शब्दावर आमदारांनी हस्तक्षेप केला. मात्र अजित पवार यांनी यात हस्तक्षेप करत फेमस हा शब्द बीड जिल्ह्याचा अपमान करणारा असून तो कामकाजातून वगळण्यात यावा अशी सूचना केली. या सूचनेचा विचार केला जाईल, असं आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी दिलं आहे.
शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर अधिवेशनाच्या दोन दिवस आधी मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले होते. त्यामुळं सर्वच मंत्री सभागृहात गोंधळलेले पहायला मिळत आहेत. अधिवेशनात शिंदे सरकारची कोंडी होत असून अनेक वेळा सभागृह स्थगित करण्यात येत आहे.