अमितभाई, देशातील पहिले एम्स नेहरुंनी १९५३ साली सुरु केले
मोदी-शहांना खोटे बोलणे व जुमलेबाजीशिवाय काहीच येत नाही, अमित शहांच्या फेकाफेकाची हवा काढली?
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे नेते खोटे बोलण्यात पटाईत आहे. भाजपाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी व अमित शहा धादांत खोटे बोलतात व तोंडावर आपटतात. छत्तिसगडमधील एका सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशात मोदी सरकारच्या आधी एकही एम्स नव्हते अशी थाप मारली पण अमित शहा यांना माहित नसावे की पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी देशातील पहिले एम्स दिल्लीत १९५३ साली सुरु केले व आजही ते पहिल्या नंबरवर आहे, असे प्रत्युत्तर देत अमित शहांना प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उघडे पाडले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपाचा खोटेपणा उघड करताना अतुल लोंढे यांनी देशातील एम्सची यादीच वाचून दाखवली. दिल्लीतील एम्सनंतर जोधपूर, भुवनेश्वर, ऋषीकेश, पटणा, भोपाळ, रायपूर आणि रायबरेली येथे एम्स उघडण्यात आली आहेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची २०१४ साली दिल्लीत सत्ता येण्याआधीच या एम्सची उभारणी करण्यात आलेली आहे. एम्सबरोबरच, आयआयएम, डीआरडीओ, आयआयटी या संस्थांचा पायाही पंडित जवाहरलाल नेहरु यांनीच घातला व त्यावर देश उभा राहिला. निवडणुकीच्या प्रचारात बिनधास्त खोटे बोलून लोकांची दिशाभूल करण्याचा मोदी-शहा प्रयत्न करत असतात पण जनता डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. बिहारमध्ये एम्स सुरु केल्याची बतावणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती तसेच केरळातही एम्स सुरु केल्याचे सांगितले पण दोन्ही ठिकाणच्या लोकांनी शहानिशा करुन मोदींच्या दाव्यातील हवा काढली. खोटं बोल पण रेटून बोल तसेच जुमलेबाजी करणे याशिवाय मोदी-शहांना काहीच येत नाही, असा टोलाही लोंढे यांनी लगावला आहे.
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यातच अमित शहा यांच्या वक्तव्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.