पेट्रोल पंपाजवळ दिवसाढवळ्या दुचाकीवर तरुणीचे अपहरण
अपहरणाची धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद, पोलिसांचा या प्रकरणी मोठा खुलासा, आरोपींची ओळख पटली?
ग्वाल्हेर दि २०(प्रतिनिधी)- मध्य प्रदेशमध्ये सध्या निवडणुकीचा काळ सुरु आहे. पण या दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे एका १९ वर्षीय तरुणीचं दिवसाढवळ्या अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एका कार्यक्रमासाठी ही तरुणी आपल्या कुटुंबासोबत आली असता हे अपहरण करण्यात आले.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील पेट्रोल पंपावरून सोमवारी दुपारी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांनी एका तरुणीचे अपहरण केले. तरुणी ग्वाल्हेर येथील बस स्थानकात उतरताच बाईकवर आलेल्या दोन आरोपींनी तिला बकडून बाईकवर बसवले आणि तिचं अपहरण केलं. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी या प्रकरणी आपला तपास सुरू केला आहे. दरम्यान आम्ही मुलीसोबत एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ग्वाल्हेरला आलो होतो. बसमधून खाली उतरल्यावर पाठीमागून आलेल्या बाईकस्वारांनी तिचे अपहरण केले. अशी माहिती तरुणीच्या कुटुंबियांनी दिली आहे. या घटनेबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक राजेश सिंह चंदेल यांनी सांगितलं की, पीडित तरुणी भिंड येथील रहिवासी असून ती आपल्या कुटुंबासह बसने ग्वाल्हेरला आली होती. ती बसमधून खाली उतरताच अपहरणकर्त्यांनी तिचं दुचाकीवरून अपहरण केलं. काही दिवसांपूर्वी एक मुलगा त्यांच्या गावात आला होता, ज्याच्या विरोधात पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली होती. महत्वाचे म्हणजे या आधी देखील तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला होता.
सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस आपला अधिक तपास सुरू करत आहेत. या प्रकरणात लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचाही प्रेमप्रकरणाशी संबंध असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अपहरण झालेली मुलगी सेवाधा कॉलेजमध्ये पदवीधर आहे.