माढा विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचा उमेदवार ठरला?
अजित पवार गटाचे आमदार बबनदादांचे टेंन्शन वाढले?, शरद पवार गटाची तयारी सुरू, मोहिते पाटलांची भूमिका निर्णायक ठरणार?
माढा दि २७(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात बंड केल्यानंतर भाजपासोबत सत्तेत सामील झाले आहेत. यावेळी पक्षातील ४० हून अधिक आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. यामध्ये माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचा देखील समावेश आहे. पण आता शरद पवार गटाकडून आगामी विधानसभेसाठी माढा मतदारसंघात आमदारकीसाठी उमेदवार निश्चित करण्यात आला आहे.
माढा विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ल्या म्हणून ओळखला जातो. आमदार बबनदादा शिंदे २८ वर्षापासून तेथे आमदार आहेत. पण आगामी विधानसभा निवडणुकीत मात्र बबनदादा शिंदे यांच्यासमोर स्वपक्षातूनच आव्हान दिले जाणार आहे. कारण शरद पवार गटाकडून माढ्यातून माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मीनल साठे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मीनल साठे यांना माढासह माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील विधानसभेला जोडलेल्या गावांमध्ये मोठा जनसंपर्क निर्माण करावा लागणार आहे. यासाठी त्यांचे सासरे धनाजीराव साठे यांचा प्रभाव मीनल साठे यांना फायद्याचा ठरू शकतो. कारण धनाजी साठे यांनी देखील माढ्याचे आमदार पद भुषवले आहे. पण त्यानंतर बरीच राजकीय समीकरणे बदलली आहेत. पण माढा भागात साठे यांनी आपला प्रभाव कायम ठेवला आहे. गेल्यावर्षी पार पडलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत मीनल साठे आणि त्यांचे पुतणे शिवसेना शहर प्रमुख शंभू साठे यांच्यात झाली . मात्र मीनल साठे यांनी आपला पुतण्या शंभू साठे याचा दणदणीत पराभव करीत सहज विजय मिळविला होता. त्याचबरोबर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी देखील माढा विधानसभा निवडणुकीकडे लक्ष घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांनी मीनल साठे यांना मदत केल्यास साठे यांचा विजय सुकर होऊ शकतो. यातून २००९ साली झालेल्या पराभवाचा बदला मोहिते पाटील घेऊ शकतात. त्यामुळे साठे जर शरद पवार गटाकडून उभारल्या तर आमदार शिंदे समोर एक नवीन आव्हान उभे राहणार आहे.
धनाजीराव साठे यांनी स्वतःची जमीन विकून संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याला सभासदांना बिले दिली होती. याची सहानुभूती देखील परिवाराच्या बाबतीत असल्याने साठेंना याचा देखील फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर कापसेवाडीच्या सभेत शरद पवार यांनी बबनदादा शिंदे यांना अप्रत्यक्ष इशारा देत त्यांची चिंता वाढवली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुक आमदार बबनदादा शिंदे यांना अधिक जोर लावावा लागणार आहे.