
27 जानेवारी 2024 हा मराठा समाजासाठी आनंदाचा दिवस आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्या आदोलनाला यश मिळाले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून ते मराठा आरक्षणाची मागणी करत होते. मात्र गेल्या आठवड्यात ते आंदोलनासाठी मुंबईच्या आझाद मैदानाकडे निघाले होते. त्यांच्यासोबत लाखो मराठा बांधव होते. जरांगेसमोर राज्य सरकार झुकले आहे, आता मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाले आहे.
कोण आहेत मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यातील आहेत. मात्र लग्नानंतर ते जालना जिल्ह्यात स्थायिक झाले. ते गेली जवळपास 15 वर्षांपासून मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण मिळावे यासाठी आग्रही आहेत. त्यांनी अनेक मोर्चे काढले आहेत तसेच अनेक आंदोलनेही केली आहे. जवळपास सहा महिन्यांपूर्वी जरांगे आपल्या आंदोलनामुळे प्रकाशझोतात आले आहेत. सुरुवातीत्या काळात ते काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून त्यांनी शिवबा संघटना स्थापन केली. याद्नारे त्यांनी समाजात मराठा आरक्षणाचा ज्योत पेटवण्याचे काम केले. 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण कोटा रद्द केल्यानंतर, त्यांनी जालना जिल्ह्यातील साष्ट-पिंपळगाव येथे तीन महिन्यांच्या आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो लोक सामील झाले होते. सप्टेंबर 2023 मध्ये अंतरवाली-सराटी या गावात ते उपोषण करत होते. त्यावेळी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मराठा समाज आणि पोलिस यांच्यात चकमक झाली, पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला होता. यात अनेक मराठा बांधव जखमी झाले होते. या घटनेनंतर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला वेगळी दिशा मिळाली. तसेच हे आंदोलन राज्यभर पसरले. मनोज जरांगे हे मराठा समाजासाठी काम करतात. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले आहे. त्यांना लहानपणासासून समाजसेवेची आवड होती. पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडील असं मनोज यांचं कुटुंब आहे. ते शेतकरी आहेत. त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलनासाठी आपली जमीन विकली असल्याची माहिती समोर आली आहे.