Latest Marathi News
Ganesh J GIF

१५ फेब्रुवारीपर्यंत निकाल द्या ! राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला. आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणात राहुल नार्वेकर काय निर्णय देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. दरम्यान, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवरील अपात्रतेसंदर्भात निकाल १५ फेब्रुवारीपर्यंत द्या, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. नार्वेकरांनी याबाबत वेळ वाढवून मागितली होती, मात्र त्यांची ही मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.

अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना द्या, अशी मागणी करत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय घेण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत सुप्रीम कोर्टाने दिली आहे. राहुल नार्वेकर यांचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी तीन आठड्यांचा वेळ मागितला होता. पण, वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी याला विरोध केला. वेळ वाढवून मागणे, हे नेहमीच होत आहे, त्यामुळे एकच आठवड्याची मुदत द्यावी, असं मनु सिंघवी म्हणाले. यावर सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना तीन ऐवजी दोन आठवड्यांची मुदत वाढवून दिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!