शरद पवारांच्या अडचणी थांबेना ! निवडणूक आयोगाने दिलेलं नवीन पक्षाचं नाव केवळ 20 दिवसचं टिकणार..नेमकं कारण काय ?
अजित पवार गट हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा निर्णय काल निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर आयोगाने शरद पवार यांना नव्या राजकीय पक्षासाठी तीन नावे देण्याचा पर्याय दिला होता. शरद पवार यांच्याकडून आयोगासमोर पर्याय सादर करण्यात आले होते. त्यानुसार शरद पवार यांना निवडणूक आयोगाने एक नाव दिले आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार” असं हे नवं नाव आहे. मात्र हे नाव केवळ वीस दिवसांसाठी असल्याचा सूतोवाच अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. शरद पवार यांच्याकडून तीन नावे देण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला नवे नाव दिले आहे. आता “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार” असं नाव निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आहे.
शरद पवार गटाने आयोगाला पाठवली ३ नावे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने बुधवारी निवडणूक आयोगाला पक्षासाठी ३ नावांचा प्रस्ताव पाठवला होता. यात अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार या ३ नावांचा समावेश आहे. त्यानुसार आयोगाने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ या नावावर शिक्कामोर्तब केल आहे.
काय म्हणाले प्रफुल्ल पटेल
राज्यसभेची निवडणूक तोंडावर आहे. ८ तारखेपासून नोटिफेकेशन आहे. म्हणून एक नाव लवकरात लवकर सूचवावं त्याप्रमाणे शरद पवार गटाला नावं दिलं आहे. इलेक्शन कनिशनने जजमेंट दिलं आहे त्यामधील शेवटच्या पॅरामध्ये उल्लेख आहे. त्यामुळे आज जे नाव दिलं आहे हे फक्त राज्यसभा निवडणुकीसाठी आहे. २७ तारखेनंतर परत शरद पवार पक्षाला अर्ज करावा लागणार असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त प्रसारित केलं आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला बुधवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत ३ नावे पाठवण्याची मुदत दिली होती. राजकारणातील अत्यंत ज्येष्ठ, अनुभवी नेते असलेल्या शरद पवारांना निवडणूक आयोग नेमका कसा निकाल देतो? याची पूर्ण माहिती होती. त्यामुळे आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाणाचे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदेंना बहाल केल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना नव्याने तयारी सुरू करण्याचा सल्ला दिला होता. ‘निकाल लागल्यानंतर चर्चा करता येत नाही. निकाल स्वीकारायचा, नवीन चिन्ह घ्यायचे. त्याचा काही परिणाम होत नसतो. चिन्ह असो अथवा नसो, निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे,’ असे ते म्हणाले होते. त्यानंतरच्या काळात त्यांनी या मुद्द्याची सविस्तर मांडणी करताना मी स्वत: दोन बैल, चरखा, गायवासरू, पंजा व घड्याळ अशा वेगवेगळ्या ५ चिन्हांवर निवडणूक लढून जिंकल्याची माहिती दिली होती.
अजित पवारांसोबत किती आमदार?
महाराष्ट्रातील 41आमदार
नागालँडमधील 7 आमदार
झारखंड 1 आमदार
लोकसभा खासदार 2
महाराष्ट्र विधानपरिषद 5
राज्यसभा 1
शरद पवारांसोबत किती आमदार?
महाराष्ट्रातील आमदार 15
केरळमधील आमदार 1
लोकसभा खासदार 4
महाराष्ट्र विधानपरिषद 4
राज्यसभा – 3
पक्ष मिळाल्यानंतर काय म्हणाले होते अजित पवार
पक्ष पळवण्याचा प्रश्नच कुठे येतो? कोण काय बोलतो, त्याचा आम्ही विचार करत नाही. मी कुणाच्याही आरोपाला उत्तर द्यायला बांधील नाही. आयोगाने आमची बाजू खरी मानली. त्यांच्या बाजूने निकाल गेला असता तर कोर्टात गेलो असतो. आम्ही राज्याची कामे करण्यासाठी इथे आलो आहोत. नवीन पिढीला बरोबर घेऊन राज्यासाठी कामे करत राहू.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री
अनिल देशमुख म्हणाले..
पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवार गटाला मिळाल्यानंतर अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत हा दावा केला आहे. त्यांनी सुरुवातीला निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया देताना काही आमदार निधीसाठी अजित पवार यांच्यासोबत गेले. पण आता मात्र लवकर मोठ्या प्रमाणात घर वापसी होईल. अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे म्हणत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
पक्ष कार्यालयावरून होणार वाद
विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ‘वेळ पडली तर पक्षकार्यालयाचा ताबा घेऊ’ असं विधान मिटकरी यांनी केलं आहे. माध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, “राज्य सरकारने निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे.त्यानुसार पक्षाचे कार्यालय ताब्यात घ्यायचे की नाही याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. अजित दादा जे सांगतील त्याप्रमाणे पुढील दिशा ठरवली जाईल. पक्षाचा कार्यालय वेळ पडली तर आम्ही ताब्यात घेऊ. त्यामध्ये कुठलेही दुमत नाहीये, असं अमोल मिटकरी म्हणाले.
अजित पवार गट सर्वोच्च न्यायालयात
महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडीत मोठा वेग आला आहे. अजित पवार यांच्या वतीने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्यावतीने अधिवक्ता अभिकल्प प्रताप सिंह यांनी याचिका दाखल केली आहे. दुसऱ्या गटाने (शरद पवार गट) सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडली तर अजित पवार गटाच्या विरोधात कोणताही एकतर्फी आदेश निघणार नाही यासाठी हे करण्यात आले आहे. ६ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारमधील अजित पवार गटाला खरी राष्ट्रवादी म्हणून घोषित केले. आयोगाने राष्ट्रवादीला पक्षाचे नाव आणि घड्याळ हे अजित पवार गटाला निवडणूक चिन्ह दिले. ६ महिने चाललेल्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला. बहुसंख्य आमदारांनी अजित गटाला राष्ट्रवादीचे नाव आणि निवडणूक चिन्ह मिळवून देण्यासाठी मदत केल्याचे आयोगाने म्हटले आहे.