Latest Marathi News
Ganesh J GIF

विजय शिवतारे 6 तासांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ बंगल्यावर बसून ? मग पुढे काय घडल ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते विजय शिवतारे हे आज मुंबईत आले आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईत आले आहेत. विजय शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांवर टोकाची टीका केली आहे. तसेच आपण बारामती लोकसभा निवडणूक लढवणारच, असा निर्धार त्यांनी केला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीत वितुष्ट तर येणार नाही ना? अशी चर्चा सुरु होती. महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही तर आपण अपक्ष देखील लढायला तयार असल्याचं शिवतारे म्हणाले. त्यांच्या या भूमिकेनंतर विजय शिवतारे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा करण्यासाठी मुंबईत बोलावलं. पण शिवतारे मुंबईत आले तर त्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अनेर तास ताटकळत बसावं लागल्याचं बघायला मिळत आहे.

विजय शिवतारे आज दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. पण तिथे त्यांची भेट होऊ शकली नाही. शिवतारे तब्बल पाच ते सहा तास तिथे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ताटकळत बसले होते. पण तरीही त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट होऊ शकली नाही. कदाचित मुख्यमंत्री इतर महत्त्वाच्या कामांमध्ये व्यस्त असल्याने त्यांची भेट होऊ शकली नसेल.

या दरम्यान सहा तास उलटले तरी मुख्यमंत्र्यांची भेट होऊ न शकल्यामुळे विजय शिवतारे आपल्या समर्थकांसह मुख्यमंत्र्यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानाच्या दिशेला निघाले. मुख्यमंत्र्यांचं हे निवासस्थान ठाण्यात आहे. शिवतारे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईतील वर्षा बंगला सोडून ठाण्यात नंदनवन बंगल्याच्या दिशेला निघाले. शिवतारे वर्षा बंगल्यावरुन ठाण्याच्या दिशेला निघाले तेव्हा पत्रकारांनी त्यांची भूमिका ऐकून घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी त्यांनी फार प्रतिक्रिया देणं टाळलं. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला भेट दिली नाही? असा प्रश्न पत्रकारांनी शिवतारेंना विचारला. त्यावर शिवतारेंनी “भेट दिली नाही काय? ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. दोन-चार दिवसांत आचारसंहिता लागणार आहे. दिवस-रात्र काम करणारा माणूस आहे. मी पाच तास थांबलो म्हणून काय झालं? आमचे ते मु्ख्यमंत्री आहेत. पाच काय मी सात बसेन. त्यांचं काम आहे. राज्याचे मुख्यमंत्री आहेत. गैरसमज नको”, अशी प्रतिक्रिया विजय शिवतारे यांनी दिली. तसेच बारामती लोकसभा निवडणार का? याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून ठरवू, अशी प्रतिक्रिया शिवतारे यांनी यावेळी दिली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!