
गेल्या काही दिवसांपासून महायुतीत मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना पाहायला मिळत आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने यात आणखी भर पडली. यावेळी विजय शिवतारे यांचा निशाणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर होता. यानंतर अजित पवार गटाकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली होती. अखेरीस हा वाद आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात आला. दोन्ही नेत्यांमध्ये यावर दीड तास सविस्तर चर्चा झाली.

नेमका वाद काय आहे? – शिंदे गटाचे नेते शिवतारे म्हणाले, मी महायुतीच्या विरोधात नाही, तर बारामतीच्या राजघराण्याच्या विरोधात आहे. शिवतारे म्हणाले की, बारामतीतील जनता पवार घराण्याला कंटाळली आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना मतदान करायचे नाही. पवारांच्या विरोधात कुणाला तरी हिंमत दाखवावी लागेल. बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. या जागेवर सुप्रिया सुळे या मविआच्या उमेदवार आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून विजय शिवतारे यांना सूचना – चर्चेत विजय शिवतारे यांनी त्यांची बाजू मुख्यमंत्र्यांकडे मांडली. बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि त्यांचे मत विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडले. बारामती लोकसभा मतदारसंघात काय चालेले आहे? गेले कित्येक वर्षे या संदर्भात ही माहीती मुख्यमंत्र्यांना दिली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी यावर पुढील दोन दिवसात आणखी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढू असे आश्वासन दिले. तोपर्यंत शांत रहाण्यासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर शिवतारे काय म्हणाले? – मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर विजय शिवतारे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. आमची सगळी बाजू आम्ही आज मांडली, आमचे सगळे प्रमुख 150 पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. माझी भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवली. दोन दिवसांनी पुन्हा बैठक बोलावण्यात आली आहे, निवडक लोकांमध्ये ही बैठक होणार आहे. दोन दिवस शांत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दोन दिवसानंतर निर्णय होईल. माझी मानसिकता काय आहे, हे मागील चार दिवस सांगत आहे, असंही शिवतारे यांनी सांगितले.

