
शिंदे गटाची यादी “कधी” होणार जाहीर, किती जागांवर गोंधळ अन् कोणाला मिळणार उमेदवारी ? बघा सविस्तर बातमी
लोकसभा निवडणुकीच्या तारखा आता कधीही जाहीर होऊ शकतात. पण महायुती आणि महाविकास आघाडी दोघांमधील जागावाटपाचा तिढा अजूनही काही संपलेला दिसत नाही. भाजपाने दोन दिवसांपूर्वी आपली उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील 20 उमेदवार होते. पण 28 उमेदवारांची नाव अजून बाकी आहेत. दरम्यान, सत्ताधारी शिंदे गटाची यादी आता लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येतंय.

महाराष्ट्रात शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या वाट्याला किती जागा येणार? याचीच उत्सुक्ता आहे. महायुतीमध्ये सर्व घटक पक्षांना सन्मानजनक जागा मिळतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यामुळे दोन्ही गटाला समाधान देण्यावर भाजप काम करत आहे.

दरम्यान, भाजपाच्या मागे फरफटत चाललोय, असा जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये संदेश जाणार नाही, याची काळजी त्यांना घ्यायची आहे. म्हणूनच हे दोन्ही पक्ष सहजासहजी कुठल्या जागेवरुन आपला दावा मागे घेणार नाही. महायुतीने महाराष्ट्रातून 45 जागा जिंकण्याच टार्गेट ठेवलं आहे. एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी जागा वाटपाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. “भाजपाने त्यांच्याकडे आधीपासूनच असलेल्या जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात कुठलाही वाद नव्हता. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची यादी रविवारी किंवा सोमवारी सकाळी प्रसिद्ध होईल” अशी महत्वाची माहिती संजय शिरसाट यांनी दिली. संजय शिरसाट यांनी पुढे बोलताना, “ज्या एक-दोन जागांचा वाद आहे, त्याचा तिढा आज किंवा उद्या दुपारपर्यंत संपेल अशी अपेक्षा आहे. येत्या एक दोन दिवसात मुख्यमंत्री-दोन्ही उपमुख्यमंत्री उर्वरित जागांवर उमेदवार जाहीर करतील” अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली.

तसेच “बारामतीमध्ये विजय शिवतारे स्वतंत्र लढणार होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना बोलवून समजावल आहे. कोकण तसच एक-दोन जागांचा प्रश्न आहे. एकदिलाने सर्व मिळून काम करु. सर्वांचा मिळून 45 चा आकडा पार करण्याचा प्रयत्न असेल” असे संजय शिरसाट यांनी म्हटले.

