
देवाघरी गेलेल्या बापाचा पीएफ काढायला कंपनीत गेली मुलगी, एचआरने केली भयानक मागणी, संभाषणांचं रेकॉर्डिंग,व्हॉट्सॲप चॅट ?
मुंबईत एका 23 वर्षीय तरुणीशी एका खासगी कंपनीच्या एचआर अधिकाऱ्याने गैरवर्तन केलंय.पीडितेला तिच्या मृत वडिलांच्या भविष्यनिर्वाह निधीची (पीएफ) रक्कम देण्यासाठी एचआर अधिकाऱ्याने तिच्याकडे लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून खेरवाडी पोलीस ठाण्यात संबंधित कंपनीच्या मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.पीडित तरुणी मृत वडिलांच्या पीएफची रक्कम मिळावी, यासाठी संबंधित खासगी कंपनीच्या ऑफिसमध्ये गेल्या काही काळापासून चकरा मारत होती; पण एचआर अधिकाऱ्याने गैरवर्तन करून तिच्याकडे लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली. तसंच मागणी पूर्ण न केल्यास वडिलांची पीएफची रक्कम मिळणार नाही, अशी धमकी दिल्याचा आरोप पीडितेनं केला
या प्रकरणी पीडितेने एचआर अधिकाऱ्याशी फोनवर झालेल्या संभाषणांचं रेकॉर्डिंग, व्हॉट्सॲप चॅट, असे पुरावेही पोलिसांना दिलेत.या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केलेली नाही; मात्र संपूर्ण चौकशीनंतर पुढील कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘संबंधित पीडित तरुणी लहान भाऊ आणि आजीसोबत राहते. पीडितेच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर 2015मध्ये तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. पीडितेच्या वडिलांनी कंपनीमध्ये पीएफच्या रक्कमेसाठी वारसदार म्हणून स्वतःच्या मुलीचं म्हणजेच पीडितेचं नाव टाकलं होतं. जेव्हा वडिलांचं निधन झालं, तेव्हा पीडितेचं वय 15 वर्षं होतं. तिला 18 वर्षं पूर्ण झाल्यानंतर तिला पीएफची रक्कम मिळणार होती.’ पीडितेनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे, की ‘वडिलांची पीएफची रक्कम मिळावी, यासाठी मी आवश्यक ते अर्ज भरून दिले होते. कागदपत्रं सादर केली होती. परंतु मला पैसे मिळाले नाहीत.
त्यानंतर मला माहिती मिळाली, की माझ्या वडिलांच्या पीएफची फाइल ते काम करत असलेल्या कंपनीच्या मॅनेजरकडे आहे. त्यामुळे मी संबंधित कंपनीच्या एचआर मॅनेजरशी संपर्क साधला. त्या वेळी त्याने पीएफची रक्कम लवकर हवी असेल, तर लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी माझ्याकडे केली.’दरम्यान, पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे; मात्र या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. पोलीस तपासातून नेमकं काय समोर येतं, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.