Latest Marathi News
Ganesh J GIF

BREAKING NEWS | उदयनराजेच साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार…!

सातारा लोकसभेसाठी भाजपने अखेर खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली. रात्री उशीरा झालेल्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. साताऱ्यातून उदयनराजे भोसले भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यात सुरु असलेला तिढा शनिवारी रात्री उशिरा सुटला आहे. सातारा लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी खासदार उदयनराजे भोसले बुधवारी रात्री दिल्लीत दाखल झाले होते. केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट मिळावी यासाठी गेली तीन दिवस वाट पाहत होते. मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन ते सातारा लोकसभेची भाजपकडून उमेदवारी मिळावी, अशी आग्रही मागणी करणार होते.

शनिवारी रात्री भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दिल्लीत झाली.त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित पवार दिल्लीत उपस्थित होते. रात्री उशीरा केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. जवळपास अडीच तास बैठक चालली. या बैठकीत सात राज्याच्या जागांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर मंत्री अमित शाह यांचं निवासस्थान असलेल्या कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी बैठक झाली.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार उदयनराजे भोसले या पाच नेत्यांमध्ये जवळपास ३० मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर अमित शाह, उदयनराजे भोसले, अजित पवार या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.अखेर अमित शाह यांनी उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.

सातारा लोकसभा मतदारसंघातून कमळ चिन्हावर उदयनराजे भोसले निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. भाजपने अखेर उदयनराजेंसाठी सातारा मतदारसंघावरील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा सांगूनही ही जागा भाजपला ठेवण्यात यश मिळवले. आता रविवारी भाजपची विविध सात राज्यातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे.

आता सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील किंवा बाळासाहेब पाटील अशी लढत होणार आहे. सातारा लोकसभेची ही निवडणूक केंद्रीय मंत्री अमित शाह व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार या दोघांसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. तसेच या निवडणुकीत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मतदार उदयनराजेंचे काम करणार की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला साथ देणार याची उत्सुकता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!