Latest Marathi News
Ganesh J GIF

मनसे प्रमुख राज ठाकरे नाशिक मधून लोकसभा लढणार ? बघा सविस्तर बातमी

केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून अद्याप नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरु आहे. नाशिकच्या जागेवर आतापर्यंत अनेक बड्या नेत्यांनी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. आता खुद्द नाशिकच्या जागेवर मनसेप्रमुख राज ठाकरेंचे नाव चर्चेत आले आहे. मनसैनिकांनीच राज ठाकरे यांना नाशिक लोकसभेच्या रणांगणात उतरण्यासाठी पत्राद्वारे गळ घातल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नाशिकच्या उमेदवारीसाठी आणखी एक नाव पुढे आल्यचे चित्र आहे. या मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीकडून अद्यापपर्यंत नाशिकच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मनसेचे अध्यक्ष यांची दिल्लीत भेट झाली. मनसे महायुतीत सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दक्षिण मुंबई, नाशिक आणि शिर्डी अशा तीन जागांच्या मागणीचा प्रस्ताव मनसेने भाजपसमोर ठेवला आहे. त्यामुळे नाशिकची जागा जर मनसेला मिळाली तर मनसेची उमेदवारी राज ठाकरे यांनीच करावी, अशी मागणी कार्यकत्यांनी केली आहे. त्यासाठी कार्यकत्यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. आता राज ठाकरे काय निर्णय घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसेच्या स्थापनेनंतर नाशिकमधून 12 नगरसवेक निवडून आले होते. दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये नाशिक शहरात 40 नगरसेवक, तीन जिल्हा परिषद सदस्य, दोन पंचायत समिती सदस्य व ग्रामीण भागात 15 नगरसेवक अशी मनसेची विजयी घोडदौड झाली होती. त्यावेळी लोकसभेचे मनसेचे नवखे उमेदवार हेमंत गोडसे यांचा निसटता पराभव झाला होता. पक्षाची पुढील वाटचाल जोमाने झाली. नाशिक नगरीत मनसेचा महापौर झाला असता, तत्कालीन राज्य सरकारकडून निधी मिळणे दुरापास्त झाले होते. अनेक अडचणी निर्माण केल्या गेल्या, पाच वर्षात तीन वर्षे आयुक्त नव्हते, तरीसुद्धा राज ठाकरेंनी विविध विकासकामे केल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. मनोज घोडके, अमित गांगुर्डे, निखिल सरपोतदार, संदीप भवर, किरण क्षीरसागर, संदीप जगझाप, रोहन जगताप, विजय ठाकरे, संजय देवरे, नितीन धानापुणे, महेंद्र डहाळे आदी मनसैनिकांनी लवकरच राज ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना नाशिकच्या जागेसाठी आग्रह करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!