
ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती विरोधकांचा प्रचार सुरू आहे, ते पाहून येणाऱ्या काळात माझ्यावरती वैयक्तिक आणि माझ्या कुटुंबावरती चुकीचे आरोप केले जातील.चुकीची माहिती पसरवून चारित्र्यहणन करण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. गेल्या दहा वर्षांत नेमके काय काम केले, याचा लेखाजोखा मांडा आणि त्यावरती निवडणूक लढवा. सोशल मीडियावर ते म्हणतात की, आता रामराज्य येणार आहे, मग मागील दहा वर्ष रावण राज्य होते का, अशी विचारणा करत काँग्रेस नेत्या आणि सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रणिती शिंदे विविध भागात बैठका, सभा, मेळावे घेताना दिसत आहेत. या प्रचारादरम्यान प्रणिती शिंदे भाजपावर घणाघाती टीका करताना पाहायला मिळत आहेत. अक्कलकोट येथे घेण्यात आलेल्या एका प्रचारसभेत प्रणिती शिंदे यांनी भाजपसह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस हे नुसत्या थापाच मारत होते. देवेंद्र फडणवीस हे तर फसवणीस आहेत, ते नुसते म्हणतात की करतो. मात्र त्यांनी काहीच केले नाही. भाजपाचे लोक फक्त आश्वासने देतात. आम्ही अमूक करू, तमूक करू असे सांगतात. त्याचे काम फक्त कागदावर असते. विरोधक खोटे आरोप करून चारित्र्यहनन करतील. सुशीलकुमार शिंदे यांच्यावर खोटे आरोप करण्यात येत आहेत. पुरावे होते, तर मागच्या १० वर्षात कारवाई का नाही केली, अशी विचारणा प्रणिती शिंदेंनी भाजपाला उद्देशून केली.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते असा सामना पाहायला मिळत आहे. दोन्ही उमेदवारांकडून मतदारसंघात जोरदार प्रचार केला जात असून, एकमेकांना होणाऱ्या टीकेला जशास तसे उत्तर देण्यात येत असल्याचे दिसत आहे.

