
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार आता टोकाला पोहचला आहे. थेट एकमेकांकडून वैयक्तिक पातळीवर आरोप-प्रत्यारोप होतांना पाहायला मिळत आहे.’माझ्या एवढी इंग्रजी निलेश लंके यांनी बोलून दाखवल्यास आपण उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचं म्हणत भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांनी लंके यांच्यावर टीका केली होती. आता त्यांच्या टीकेला शरद पवार गटाकडून उत्तर देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सुजय विखे यांना प्रत्युत्तर देतांना थेट विखेंचा बापच काढला.

याबाबत ट्वीट करत प्रशांत जगताप म्हणाले की, “निलेश लंकेंना फाडफाड इंग्लिश बोलता येत नाही असे सुजय विखे म्हणाले. अरे सुजय… आपला बाप मंत्री होता, कारखानदार होता, आपण कॉन्व्हेन्ट मध्ये शिकलात. निलेश लंके यांचे वडील गरीब शेतकरी, लंके स्वतः चहा विकून उदरनिर्वाह करायचे (खराखुरा चहा मोदी सारखा काल्पनिक नाही). तुझ्यासारखी श्रीमंत बापाची पोरं गरिबाला हिनवण्यातच समाधान मानतात, विखे मनाने अगदीच भिकारी निघाले, असे प्रशांत जगताप म्हणाले.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अहमदनगर येथे प्रचाराच्या सुरुवातीलाच उमेदवार एकमेकांना आव्हान देतांना पाहायला मिळत आहे. मी जेवढी इंग्रजी बोललो, तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही असं खुल आव्हान भाजप उमेदवार सुजय विखेंनी निलेश लंके यांना दिलं आहे. अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात सुजय विखे बोलत होते. मेळाव्याच्या सुरुवातीला सुजय विखेंनी संसदेत इंग्रजीत केलेल्या भाषणाचा एक व्हिडीओ दाखवला. याचा आधार घेत सुजय विखेंनी निलेश लंके यांना इंग्ज्री बोलण्याचे आव्हान दिले आहे. महिनाभरात जरी त्यांनी हे इंग्रजीतील भाषण पाठ करून म्हणून दाखवावं असं सुजय विखे म्हटले आहे.

विखेंच्या याच टीकेला आता रोहित पवारांनी देखील उत्तर दिले आहे. “लोकप्रतिनिधीला इंग्रजी-हिंदी समजते की नाही हे महत्वाचं नसतं, तर लोकप्रतिनिधीला जनतेची भाषा, त्यांच्या अडचणींची भाषा समजली पाहिजे आणि जनतेची भाषा समजण्यात आम्ही दिलेले उमेदवार माहीर आहेत. नाहीतर इंग्रजी-हिंदी येऊनही संसदेत गप्प बसणाऱ्या भाजप खासदारांची, प्रश्नांची उत्तरं न देता येणाऱ्या मंत्र्यांची संख्या काही कमी नाही. असो! भाषा किंवा शिक्षण यावरुन कर्तृत्व सिद्ध होत नाही. टीका करायला विषय नाही म्हणून विद्यमान खासदारांनी ही टीका केली असेल हे आम्ही समजू शकतो. पण याच अविर्भावात तुमच्या ‘सर्वोच्च’ नेत्याला हा प्रश्न करू नका, नाहीतर तुमचेच बारा वाजतील, असे रोहित पवार म्हणाले.

