
लोकसभेसाठी रणधुमाळी सुरू झाली असून, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी प्रचारसभांना सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत.आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच शरद पवारांनी काँग्रेसला हद्दपार केले. आमचे स्वप्न पूर्ण केले. त्याबद्दल आभारी आहे, असा खोचक टोला भाजपा नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

वर्धा मतदारसंघात रामदास तडस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. काय अवस्था झाली आहे बघा, काँग्रेस वर्ध्यातून हद्दपार, महायुतीला इथे उमेदवार सापडेना. मग उमेदवाराचा शोध सुरु झाला. मग एक उमेदवार त्यांनी काँग्रेसमधून आयात केला. त्यांना पक्के माहिती आहे की, विधानसभेत निकाल काही बरा लागणार नाही. लोकसभेचे तिकिट घेऊन आपण शहीद व्हावे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महात्मा गांधींचे वर्धा ना काँग्रेसचे ना शरद पवारांचे. वर्धा भाजपाचे आहे, नरेंद्र मोदींचे आहे, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. रामदास तडस यांनी गेल्या १० वर्षांत सर्वसामान्य जनतेत सातत्याने भूमिका घेतली. सामान्य लोकांमध्ये ते फिरत राहिले. सातत्याने लोकांना ते उपलब्ध होते. त्यामुळेच जनतेचे विलक्षण प्रेम रामदास तडस यांना मिळाले आहे. रामदास तडस पैलवान आहेत. आमच्या पैलवानाने असा डाव टाकला की, शरद पवारांच्या हातून कुस्तीगीर परिषद निघाली. त्यांना सगळे डावपेच माहिती आहेत. वेळेप्रसंगी धोबीपछाड देतात, असे कौतुकोद्गार काढत, रामदास तडस ६० टक्के मतांनी निवडून येतील. आधी लाट होती, आता लाट नाही त्सुनामी नाही. अब की बार ४०० पार होणार आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.

शरद पवार या ठिकाणी येऊन गेले. शरद पवारांचे मनापासून आभार मानतो. आम्हाला जी गोष्ट जमली नाही, ती शरद पवारांनी करुन दाखवली. आम्ही काँग्रेसमुक्त वर्ध्याचा नारा दिला होता. आम्हाला पंजा इथून गायब करता आला नाही. वर्ध्यातून शरद पवारांनी पंजा गायब करुन दाखवला. आमचे स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केले. महात्मा गांधींचे नाव सांगून काँग्रेसने राजकारण केले. त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार करण्याचे काम शरद पवारांनी केले. आपण सगळ्यांनीच त्यांचे आभार मानले पाहिजेत, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

